राष्ट्रवादीच्या नेतृत्वांकडून राजकारणासाठी पाणीप्रश्‍नाचा सोइने वापर- विखे पाटील

File Photo

राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट पवारांवर टिका

नगर: जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पाखाली येणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासुन वंचित ठेवण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रस्थापित नेतृत्वाकडून होत आहे. राजकारणासाठी जिल्ह्यातील पाणीप्रश्‍नाचा सोईने वापर करुन हा जिल्हा भकास करण्याचे कारस्थान त्यांचे अनेक वर्षांपासुन सुरु असुन, जिल्ह्याबाहेरील या अतिक्रमणाला आता लोकांनीच नाकारायचे ठरविले आहे. त्यामुळेच पक्षीय राजकारणा पलिकडे जावून हक्काच्या पाण्याचा संघर्ष भविष्यात उभा करावा लागेल. व्यक्‍तिगत राजकीय भविष्यापेक्षा जिल्ह्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा सोडविणे, हाच माझा प्राधान्यक्रम आहे असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केले.

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ना. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, कुकडी समुहात 30 टिएमसी पाण्यापैकी कुकडीच्या डाव्या कालव्याला अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यालाही एकुण 20 टिएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. यात नगर जिल्ह्याला 15 टिएमसी व सोलापूरलाही 5 टिएमसी पाण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत नगर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले 15 टिएमसी पाणीही मिळत नाही. जिल्ह्याला पाणी न मिळू देण्याचे षडयंत्र गेल्या अनेक वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी केले. लोकनेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन, या भागाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

कुकडी प्रकल्पाच्या सर्व कालव्यांचे आवर्तन समान पद्धतीने होणे अपेक्षित आहे, परंतू नगर जिल्ह्याला पाणी येणाऱ्या डाव्या कालव्यास पाणी कमी दिले जाते व इतर कालवे पुणे जिल्ह्यात असल्याने त्यांना जास्त पाणी दिले जाते. शिवाय धरणातील पाणी थेट नद्यांना सोडून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बेकायदेशिरपणे भरुन घेतले जातात. साठविलेले पाणी नदीत सोडण्याची प्रकल्प अहवालात तरतुद नसतानाही ते कसे सोडले जाते? या मागे कोणाचे स्वार्थी राजकारण आहे? असा सवाल ना.विखे पाटील यांनी उपस्थित केला.

पुणे जिल्ह्यातील नेत्यांच्या दबावाखाली असलेले जिल्ह्यातील कोणतेही नेते आज या हक्काच्या पाणी प्रश्‍नावर बोलायला तयार नाहीत. नगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणीही शिल्लक ठेवले जात नाही. उरलेले तुटपूंजे पाणी केवळ पिण्यासाठी दिले जात असल्याचे दाखवून बोळवण केली जात असतानाही या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होवून बसलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मात्र याबाबत शब्द सुध्दा काढायला तयार नाही हे दुर्दैवी आहे. असे सांगून विखे म्हणाले, कुकडी डावा कालवा व घोड कालवा यांची आपल्या नगर जिल्ह्यातील पाण्याची वानवा असताना हा ज्वलंत प्रश्न बाजुला ठेवून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर भागात आम्ही खुप सेवा करत आहोत असे दाखविण्याचा सुरु असलेला प्रयत्न हा केवळ जनतेची दिशाभूल करणारा असून, नगर जिल्ह्यातील जनतेची केवळ पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी थेट फसवणूक केली हे आता उघड झाले आहे.

कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत असलेल्या पाथर्डी तालुक्‍यालाही ही मंडळी पाणी मिळू देत नाहीत, त्यामुळेच विविध कारणाने जिल्ह्यात येवून पाणी प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या नेत्यांची कृती हे बेगडी प्रेम दर्शवते. या ज्वलंत पाण्याच्या प्रश्नाकडे पक्षीय राजकारणा पलिकडे जावून आता पाहण्याची वेळ आली असून, हक्काच्या पाण्याची लढाई ही आता स्वाभिमानाची झाली असून, पक्षभेद विसरुन या पाण्यासाठी एकत्रित येण्याची आता गरज आहे. माझ्या राजकीय भवितव्याची कोणतीही तमा न बाळगता खासदार साहेबांनी सुरु केलेली ही पाण्याची लढाई मी कोणतीही तमा न बाळगता पुढे नेणार आणि पाण्याच्या प्रश्नापायी नगर जिल्हा उध्वस्त करणाऱ्यांना धडा शिकविणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)