नगरमध्ये राष्ट्रवादीवर अखेर उमेदवार आयातीची वेळ !

 पक्षात सक्षम उमेदवाराचा अभाव; डॉ. सुजय विखेंची कोंडी

नगर: सक्षम उमेदवाराचा अभाव असतांनाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केली. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कॉंग्रेसला न सोडण्याची हट्टवादी भूमिका घेवून अन्य पक्षाबाहेरील अनेकांची चाचपणी केली. उमेदवाराचा शोध घेतांना पक्षश्रेष्ठींच्या चांगलेच नाकीनव आले. पण हे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसमधून उमेदवार आयात करण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची यात महत्वाची भूमिका ठरली. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांची कोंडी करण्याची संधी राष्ट्रवादीने सोडली नाही. त्यातून अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभेसह विधानसभेसाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्यापासून हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला जाईल, या आशेवर डॉ. विखे यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतू हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला जाणार नाही. राष्ट्रवादीच सक्षमपणे ही जागा लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहिर केले आहे. तरी डॉ. विखे यांची आशा काही कमी झाली नाही. शेवट्या क्षणाला तरी राष्ट्रवादी हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडले व मीच कॉंग्रेसचा उमेदवार राहिली. परंतू राष्ट्रवादीने महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना उमेदवारी निश्‍चित करून त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त काढला आहे. त्यामुळे डॉ. विखे यांच्या आशा मावळल्या असल्याचे चिन्हे दिसत आहे.

राष्ट्रवादीतील अनेकांनी पक्षाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्‍त केली. माजी आमदार नरेंद्र घुले, दादा कळमकर, ऍड. प्रतापराव ढाकणे यांनी उमेदवारीवर दावा केला. परंतू शरद पवार यांनी पक्षातील इच्छुकांकडे दुर्लक्ष करून अन्य पक्षाबाहेर अनेकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, विखे शिक्षण संस्थेचे डॉ. अशोक विखे यांचीही चाचपणी केली. परंतू उमेदवार सक्षम होत नसल्याचे चित्र समोर आले. अर्थात डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारीसाठी वारंवार शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून उमेदवारीसाठी साकडे घातले. परंतू विखेंसाठी जागा सोडायची नाही, ही राष्ट्रवादीची भूमिका आता लपून राहिली नाही. जाहिरपणे विखेंना विरोध केला नसला तरी त्यांची कोंडी करण्याची संधी मात्र राष्ट्रवादी सोडली नाही.

राष्ट्रवादीत उमेदवाराचा वाणवा असल्याने व सक्षम उमेदवार पक्षाकडे नसल्याने अखेर मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसमधून उमेदवार आयात करण्याची वेळ पक्षावर आली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी श्रीगोंद्यातील नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी व महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांना पक्षात घेवून लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे. नागवडे चालतात मग विखे का नाही असा प्रश्‍न या निमित्ताने उभा होत आहे. अर्थात नागवडे यांनी लोकसभा नाही तर विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. तरी राष्ट्रवादीने त्यांच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवाराची माळ टाकण्याची भूमिका घेतली. याचा अर्थात विखेंची कोंडी करून त्यांना उमेदवारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)