राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भूमिका जाहीर मनसेला महाआघाडीत स्थान नाही 

मुंबई – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाविरोधात महाआघाडी करण्याबाबत विरोधी पक्षांच्या जोरबैठका सुरु आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्र विमान प्रवासानंतर मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेने जोर धरला होता. अनेक तर्कवितर्क काढले गेले. पण या घटनेला चोवीस तासही उलटत नाही तोच राष्ट्रवादीने या चर्चेला पूर्णविराम दिला.

राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षांची विचारधारा पाहता मनसेला महाआघाडीत स्थान नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमिवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा जुळणाऱ्या समविचारी पक्षांसोबतही बोलणी सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने कॉंग्रेससोबत आघाडीत येण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा राष्ट्रवादी कॉग्रेसला विरोध आहे. त्यामुळे आंबेडकर यांनी एमआयएमसोबत युती केली. आंबेडकर यांना आघाडीत घेण्याचा निर्णय अद्याप कॉंग्रेसने घेतलेला नाही. तरी कॉंग्रेसची व राष्ट्रवादीची जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. लोकसभेत पराभव झालेल्या काही जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. परंतु, त्यावर अद्यापही एकमत झालेले नाही.

भाजपाविरोधातील आघाडीत मनसेचाही समावेश करावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही होती. तसा प्रस्ताव राष्ट्रवादीने कॉंग्रेसला दिला होता. परंतु, केंद्रिय आणि राज्यस्तरीय पातळीवर कॉंग्रेसने त्याला विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाली होती. पण, गुरुवारी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या औरंगाबाद ते मुंबई या विमानप्रवासामुळे पुन्हा मनसे-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा रंगली. चर्चेमुळे कॉंग्रेससोबतच्या आघाडीवर परिणाम होईल या भीतीने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या निवडणूकीत मनसे महाआघाडीत नसेल. महाआघाडीत मनसेने यावे, अशी इच्छा असली तरी राज ठाकरे यांची कार्यशैली आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा पाहता मनसेला महाआघाडीत स्थान नाही, असे मलिक यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपात तणाव 

दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमधील संबंध फारच ताणले गेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर घणाघाती टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्यांच्या सुरु असलेल्या दौऱ्यात मोदींवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र येत असल्याने आणि शिवसेनेच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे भाजप सध्या बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टिकेनंतरही त्याला कोणीही प्रत्युत्तर देत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, भाजपा अजूनही शिवसेनेसोबत युती होईल, याबाबत आशावादी आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)