पिंपरी -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीपासून अंतर बाळगून राहत आहे. त्यामुळे आता शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही आमदार बनसोडे नकोसे वाटू लागले असून राष्ट्रवादीच्या बॅनरवरून त्यांचे फोटो गायब होऊ लागले आहेत. आमदार बनसोडे यांनी स्वत:हून घेतलेली भूमिकाच त्यांना राजकीयदृष्ट्या अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे. “दोन दगडावर पाय ठेवणे’ अण्णांसाठी राजकीय दृष्ट्या मारक ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन मतदारसंघ आहेत. त्यामधील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. 2009 च्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे विधानसभेत गेले. 2014 मध्ये मोदी लाटेत बनसोडे यांचा शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी पराभव केला. त्यानंतर पाच वर्षे बनसोडे राजकीय विजनवासात गेले होते. 2019 ची विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यावर ते पुन्हा सक्रीय झाले. राष्ट्रवादीच्या शहरातील काही नेत्यांच्या आग्रहामुळे बनसोडे यांना राष्ट्रवादीची पुन्हा उमेदवारी मिळाली. पक्षाची ताकद, बनसोडे यांचे नियोजन आणि पराभवातून मिळालेल्या अनुभवामुळे बनसोडे पुन्हा एकदा आमदार झाले. मात्र, आमदार म्हणून निवडून आल्यापासून बनसोडे हे पक्षापासून फटकून राहत असल्याचे वारंवार दिसून आले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बनसोडे पक्षाच्या नेत्यांसोबत अधून-मधून दिसत होते. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. विविध प्रश्नांवर आंदोलने केली. आमदार बनसोडे मात्र एकाही आंदोलनाला फिरकले नाहीत. आघाडीची सत्ता गेल्यापासून तर बनसोडे पक्षाचे मेळावे, बैठकांपासून दूर गेल्याचे वारंवार समोर आले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षविरोधी आमदार बनसोडे यांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चाही सातत्याने सुरू असतात. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केल्यामुळे त्यामध्ये अधिकच भर पडली होती. त्यामुळे आमदार बनसोडे 2024 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार की शिंदे गटात जाणार असे तर्क लढविले जात आहेत.
फलकांवरील छायाचित्र गायब
31 मार्च रोजी पिंपरीतील राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांचा वाढदिवस होता. यानिमित्त पिंपरीबाजार पेठेसह परिसरात त्यांच्यावतीने जोरदार फलकबाजी करण्यात आली होती. मात्र, या फलकांवर राष्ट्रवादीचे केंद्र, राज्य स्तरावरील नेत्यांसह स्थानिक नेत्यांच्या छबी झळकत होत्या. मात्र, आमदार अण्णा बनसोडे यांचा फोटो बॅनरवरून गायब झाल्याने शहराच्या राजकीय गोटात पुन्हा एकदा बनसोडे यांच्याबाबतीत चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
दोन दगडावर पाय ठेवणे, अण्णांसाठी ठरणार मारक
आमदार अण्णा बनसोडे यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण राष्ट्रवादीतच कायम राहणार असे, अण्णा स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संशय कायम राहणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष कालावधी बाकी आहे. त्यामुळे आमदार बनसोडे सध्या कोणतीच स्पष्ट भूमिका घेताना दिसत नसून दोन दगडावर पाय ठेवणे, त्यांच्यासाठी मारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.