लेटर्स फ्रॉम इजिप्त: नयनमनोहर रत्न लक्‍सोर

श्‍वेता पटवर्धन

प्रिय जिज्ञासा,
मी तुला आतापर्यंत लक्‍सोर मधील स्थळांची जी माहिती सांगितली त्यावरून तुला कदाचित असं वाटेल की हे शहर एकदम पुरातन आहे. पण हे शहर आणि येथील पर्यटन स्थळे अगदी दोन टोकाची आहेत. मी कायरोहून येथे आले तेव्हा बसचा 12 तासांचा प्रवास करून खूप कंटाळले होते. खिडकीतून बाहेर वाळवंट सोडून दुसरे काहीच दिसत नाही इथे. पण लक्‍सोर शहरात प्रवेश केला आणि जीव अगदी सुखावून गेला. समांतर रस्ते, दोन रस्त्यांच्या मध्ये झाडी, फूटपाथ सगळं अगदी व्यवस्थित आणि टापटीप.

सिटीसेन्टर मध्ये प्रवेश केल्यावर तर आपण युरोपमध्ये आलो की काय, असे क्षणभर वाटून गेले. नाईल नदी, त्याच्या काठी मोठा फूटपाथ त्यावर बसायला बाक, छोटासा रस्ता- त्यावर शिस्तबद्धरित्या वाहने चालली आहेत, नाईलच्या समोर टेम्पल ऑफ कर्नाक मोठ्या दिमाखात उभे आहे. खऱ्या अर्थाने नयनरम्य! परकीय आक्रमणांनी इजिप्तला दिलेली एक सुंदर भेट आणि ती भेट तितक्‍याच काळजीपूर्वक जतन केली आहे ती इथल्या लोकांनी. लक्‍सोरला इजिप्तच्या शहरांमधील एक रत्न का म्हणतात ते इथे आल्यावर कळते.

तसं पाहिलं तर चालत फिरायला फार तर तासभर लागेल इतके छोटे आहे हे गाव. पण इथल्या फेरोंनी ते अजरामर करून ठेवले म्हणून इथे पर्यटकांची रीघ लागते आणि आजही ते इतके सुंदर आहे की, प्रत्येक पर्यटक इथून फक्त आनंद आणि गावाची अविस्मरणीय चित्रं घेऊन जातो. हे गाव छोटे असल्यामुळे इथे टॅक्‍सी जरी असल्या तरी घोडागाड्या देखील भरपूर आहेत. त्यामधून आपण सफर करू शकतो.

या गावाच्या मधोमध नाईल वाहते. त्यामुळे पूर्व किनारा आणि पश्‍चिम किनारा असे गावाचे दोन भाग आहेत. पूर्व किनाऱ्यावर ओल्ड किंग्डमची स्मारके (टेम्पल ऑफ कर्नाक, टेम्पल ऑफ लक्‍सोर) आणि पश्‍चिम किनाऱ्यावर न्यू किंग्डमची स्मारके (व्हॅली ऑफ किंग्ज, व्हॅली ऑफ क्वीन्स) आहेत. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायला बोटी आहेतच. पर्यटकांसाठी खास बोटराईड असते. त्याला इथे “फलुका’ म्हणतात. सूर्यास्ताच्या एक तास आधी बोटीत बसायचे आणि वाऱ्याच्या हेलकाव्यांवर मुग्ध होत विलोभनीय सूर्यास्त बघायचा हे खरंच सुख होते. या बोटी शिडाच्या असतात आणि त्या वल्हवत नाहीत. वाऱ्याने त्या संथपणे हलतात. याच्या जोडीला बोटीत त्यांनी मला मिंट टी (पुदिन्याचा चहा) बनवून दिला. वाळवंटातील त्या थंड बोचऱ्या वाऱ्यात त्या चहाने और मजा आया.

लक्‍सोरच्या पश्‍चिम किनाऱ्यावर युरोपियन स्टाईलचे कॅफे आहेत. तिथला मेन्यू देखील बहुतेक करून नॉन-इजिप्शियन असतो. त्या कॅफेमध्ये बसून कॉफी पिता पिता तुम्ही भान हरपून नदीकडे बघत राहता. कॅफेच्या मागे बंगले आहेत आणि ते पर्यटकांना भाड्याने दिले जातात. त्या बंगल्यामध्ये कित्येक परकीय लोक शहराच्या स्ट्रेसपासून दूर आहे म्हणून येऊन राहतात. मला वाटते चार दिवस कोणी या गावात येऊन राहिला तर सगळा स्ट्रेस पळून जाईल त्याचा. माझ्या पत्रातून तुला कळलेच असेल, मला हे शहर किती आवडले आहे ते. पण आता कायरोला परत जायची वेळ आहे. परंतु पुन्हा कधीही मला परत इथे येण्याची संधी मिळाली तर काहीही झाले तरी ती मी सोडणार नाही हे नक्की.

तुझी,
प्रवासी मावशी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)