करतारपूर कोरिडॉरमुळे शत्रुत्व नष्ट होईल
लाहोर: करतारपूर कोरिडोरमुळे भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे शत्रुत्व नष्ट होण्यास आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असे पंजाबच्या मंत्रिमंडळातील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट संबंधही पुन्हा सुरळीत होतील, अशी आशाही सिद्धू यांनी व्यक्त केली आहे. करतारपूर कोरिडोरच्या भूमीपूजन समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पत्रकारांना घेऊन सिद्धू रवाना झाले आहेत.
लाहोरपासून 120 किलोमीटरवर नरोवाल येथे हा समारंभ होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते बुधवारी या कोरिडोरचे भूमिपूजन होणार आहे. अमृतसरजवळच्या वाघा सीमेवर पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या अधिकाऱ्यांनी सिद्धू यांचे स्वागत केले.
गुरुदासपूरमधील डेरा बाबानानकपासून करतारपूर साहिब नारोवाल दरम्यानच्या 4 किलोमीटरच्या कोरिडोरमुळे भारतातील शीख भाविकांना करतारपूर येथे व्हिसा शिवाय प्रवेश मिळू शकणार आहे. हा कोरिडोर खुला केल्याबद्दल सिद्धू यांनी इम्रान खान यांचे आभार मानले आहेत.
“इम्रान खान यांनी शीख समुदायासाठी तीन महिन्यांपूर्वी या कोरिडोरची योजना निश्चित केली होती. आता ती अस्तित्वात येत आहे. 73 वर्षांपासून सुरू असलेली प्रतिक्षा यामुळे समाप्त झाली.’ असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा