काऊदऱ्यावर गुलाल-भंडाऱ्याच्या उधळणीत निसर्गपूजा

निसर्गपूजेबरोबर झाडे लावा-झाडे जगवाचा संदेश; जेजुरीच्या पालख्यांचा सहभाग

नवारस्ता – पाटण तालुक्‍यातील मणदुरेच्या डोंगरपठारावरील काऊदऱ्यावर जेजुरी जानाईदेवीचे भक्तगण आणि कराड, पाटण व तारळे परिसरातील हजारोंच्या संख्येने निसर्गप्रेमींनी गुरूवारी सकाळी हजेरी लावून निसर्गपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत भाविकांनी निसर्गाची पूजा करुन निसर्गाला नारळ अर्पण केला. यावेळी जानाईदेवीच्या नावाने चांगभलंच्या गजरात निसर्गप्रेमी व भाविकांनी कड्यावरुन गुलाल-भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली.

काऊदऱ्यावर दाखल झालेल्या जेजुरीच्या पालखीचे स्वागत पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी जेजुरीच्या नगराध्यक्षा विनाताई सोनवणे, जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण बारबाई, निसर्गपूजा प्रवर्तक विजयकुमार हरिश्‍चंद्रे, विनय गुरव, पाटण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, माजी अध्यक्ष विक्रांत कांबळे, सचिव विद्या म्हासुर्णेकर-नारकर, राजेंद्र सावंत, सौ. विजया म्हासुर्णेकर, मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, संस्थापक राजेंद्र बारबाई, जेजुरीचे नगरसेवक बाळकृष्ण बारबाई, रमेश बयास, शिवाजी कुतवळ, रत्नाकर मोरे, रवी बारबाई आदी उपस्थित होते.

निसर्गातील पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जंगलतोड रोखण्याची गरज आहे. आपल्या आजुबाजूचा परिसर, निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी आवाहन करत जेजुरी येथील ग्रामस्थांनी राज्याला जागृतीचा अनोखा संदेश देणारी निसर्गपूजा हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत जानाईदेवी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केली. यावेळी जेजुरी येथील अभिषेक बावळे, वैभव रसाळ, विक्रम यादव यांनी तयार केलेल्या ड्रोनच्या सहाय्याने सोहळ्याप्रसंगी पुष्पवृष्टी करण्यात आली. डोंगरपठारावर जेजुरी येथून हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मार्तंड पालखीचे आगमन झाल्यानंतर जानाईदेवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा ट्रस्टच्यावतीने अन्नदान करण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते परिसरातील महिलांना वनदेवी मानून साडी-चोळी वाटप करण्यात आली. त्यानंतर जेजुरीच्या पालखीचे निवकणेच्या दिशेने प्रस्थान झाले. काऊदऱ्यावरील सोहळा पार पडल्यानंतर डोंगरपठारावर स्वच्छता मोहीम राबवून प्लॉस्टीकची होळी करण्यात आली.

जेजुरी येथून दरवर्षी पायी चालत जानाईदेवीच्या मंदिरापर्यंत पालखी येत असते. जेजुरी, पुणे जिल्ह्यासह मुंबईपर्यंतचे हजारो भाविक निवकणेच्या जानाईदेवीच्या यात्रेत सहभागी होतात. निसर्गपुजेनंतर पालखीचे निवकणे मंदिराकडे पायवाटेने प्रस्थान झाले. निवकणे येथे पालखीचा तीन दिवस मुक्काम असून अन्नदान सेवा ट्रस्टच्यावतीने तेथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद व अन्नदान करण्यात आले. पालखी पुन्हा जेजुरीला पोहोचेपर्यंतच्या कालावधीत व तदनंतर शिमग्याच्या सणाच्या नंतरचा येणारा मंगळवार अथवा शुक्रवार यादिवशी पंचक्रोशीतील लोकांना बोळवणीचे जेवण दिले जाते.

काऊदऱ्यावर साजरी करण्यात येणारी निसर्गपूजा व अन्नदान करण्याचा उपक्रम गेल्या सत्तावीस वर्षापासून सुरू करण्यात आला असून प्रतिवर्षी त्यात सातत्य राखले जात आहे. निसर्गपूजेच्या कार्यक्रमास यादवराव देवकांत, शोभा कदम, शशिकला हादवे, सौ. इंगवले, सौ. शेडगे, खाशाबा चव्हाण, विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)