सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठे खिंडार; रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात जाणार

खासदार विजयदादांनी प्रवेशाला दिला पाठिंबा

उद्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील गरवारे सभागृहात प्रवेश

सोलापूर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज असणारे राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील त्यांच्या गटाच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मंगळवारी अकलूज येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्या दुपारी 12.30 वाजता भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगितले. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे हॉल येथे भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांनीसुद्धा रणजितसिंहांच्या भाजप प्रवेशाला पाठिंबा दिला.

भाजप प्रवेशाचे कारण ठरले कृष्णा भीमा स्थिरीकरण
गेल्या दहा वर्षांपासून कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी प्रयत्न सुरु असताना निधी खर्च करावा, असे कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. सोलापूर जिल्ह्यात आज दुष्काळी परिस्थिती आहे. दर पाच, सात वर्षांनी आपल्याला दुष्काळाला सामोरे जावे लागते. हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सहा जिल्हे आणि 31 तालुक्‍यांचा प्रश्न आहे. त्यासाठी या योजनांवर काम केले पाहिजे . केंद्र व राज्य पातळीवर या योजनेचे नियोजन करून पुन्हा एकदा काम करावे लागणार आहे. योजना पूर्ण करायची असेल तर भाजपच ही योजना पूर्ण करू शकते असे वाटते, असे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचेही कौतुक केले. आपण विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठीच भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

भाजप प्रवेशाला विजयदादांचा पाठिंबा
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप प्रवेश करणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या आणि भाजपच्या उंबरठ्यावर असलेल्या मोहिते पाटील गटाची महत्वाची बैठक अकलूज येथील शिवरत्न बंगल्याच्या आवारात झाली. या बैठकीला खा. विजयसिंह मोहिते पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, जयसिंह – मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते – पाटील यांच्यासह करमाळाचे शिवसेना आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, माळशिरस तालुक्‍यातील सर्व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सभापती वैष्णविदेवी मोहिते पाटील, सांगोला, करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ तालुक्‍यातील पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो समर्थक उपस्थित होते.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)