रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
मुंबई – क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित योनेक्स सनराईज एमएसएलटीए 13व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात धृव तंग्री व कृष्णा हुडा तर मुलींच्या गटात संजना सिरीमल्ला व रेनी सिंगला यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात चंदीगडच्या पाचव्या मानांकीत कृष्णा हुडा याने हरियाणाच्या दुसऱ्या मानांकीत चिराग दुहानचा 2-6, 6-4, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत पंजाबच्या चौथ्या मानांकीत धृव तंग्रीने हरियाणाच्या नवव्या मानांकीत करण सिंगचा 6-4, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात तेलंगणाच्या अव्वल मानांकीत संजना सिरीमल्ला हीने हरियाणाच्या आठव्या मानांकीत परी सिंगचा 6-1, 6-1 असा तर दुस-या लढतीत हरियाणाच्या सातव्या मानांकीत रेनी सिंगलाने कर्नाटकच्या नैशा श्रीवास्तवचा 6-1, 6-3 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीच्या मुलांच्या गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत कर्नाटकच्या निखिल निरंजनने मध्यप्रदेशच्या डेनिम यादवच्या साथीत चंदीगडच्या अजय सिंग व कृष्णा हुडा या जोडीचा 6-3, 6-4 पराभव करत विजेतेपद पटकावले. तर मुलींच्या गटात हरियाणाच्या रेनी सिंगलाने महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरच्या साथीत महाराष्ट्राची जोडी ऋतूजा चाफळकर व हृदया शहा यांचा 3-6, 6-3, 11-9 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.