भाजपकडून अपयश लपवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा आधार – असदुद्दीन ओवेसी

संग्रहित छायाचित्र..

320 मतदारसंघात त्रिकोणी सामना होणार

हैदराबाद – यंदा लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नाही. तसेच हताश भाजपा आपले अपयश लपवण्यासाठी निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आधार घेत आहे. पण लोक पुन्हा एकदा खोट्या आश्वासनाला (जुमले) बळी पडणार नाहीत. जबाबदारीने ते मतदान करतील, असा दावा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. यंदा 543 जागांवर चुरशीची लढत होणार असल्याचेही ते म्हणाले.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओवेसी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूकीत 2014 प्रमाणे “मोदी लाट’ नाही. यावेळच्या निवडणुका या खुल्या होतील. हैदराबादसह प्रत्येक जागेवर चुरशीची लढत होईल. आमचा पक्ष बिगर भाजपा, बिगर कॉंग्रेसचा हिस्सा आहे. आमच्या आघाडीचे नेतृत्व तेलंगणा राष्ट्र समितीचे संस्थापक आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करत आहेत. ही आघाडी भारताच्या राजकीय विविधतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आवश्‍यक असेल आणि अनेक प्रादेशिक नेते आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुलनेत सक्षम आहेत.

एका अहवालाचा हवाला देताना ते म्हणाले की, 543 लोकसभा मतदारसंघापैकी 100 मतदारसंघात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. पण 320 मतदारसंघात भाजपा, कॉंग्रेस आणि प्रादेशिक पक्ष असा त्रिकोणी सामना होणार आहे. मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधीत्व कमी झाल्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, 2014 मधील निवडणुकीत भाजपाकडून जिंकण्यात आलेल्या 280 सदस्यांपैकी एकही मुस्लिम सदस्य नव्हता. कारण भाजपा केवळ बहुसंख्यक समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी लोकशाही चालवू इच्छितो. जर मी मोदींविरोधात बोललो तर याचा अर्थ असा नाही की मी बहुसंख्यकांविरोधात बोलतो. मी कधीच बहुसंख्यकांच्या विरोधात नाही. मी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)