राष्ट्रीय विज्ञान दिन- सर रामन्‌ : विज्ञानाभिमुख समाजाचे स्वप्न

डॉ. मेघश्री दळवी

दरवर्षी 28 फेब्रुवारीला आपल्याकडे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस खास यासाठी की, 28 फेब्रुवारी 1928 रोजी सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन्‌ यांनी आपलं संशोधन नेचर या शास्त्रीय नियतकालिकातून पहिल्यांदा जगापुढे आणलं.

प्रकाशकिरणं एखाद्या माध्यमातून जाताना त्यांची दिशा बदलते, पण त्यातल्या बहुतांश किरणांची तरंगलांबी बदलत नाही. हा परिणाम रेली विकिरण (रेली स्कॅटरिंग) म्हणून ओळखला जातो. मात्र त्यातल्या अत्यंत अल्प किरणांची तरंगलांबी त्या माध्यमातल्या रेणूंमुळे बदलते, हे सर रामन्‌ यांचं निरीक्षण होतं. एक कोटी किरणांमध्ये एका किरणावर इतक्‍या सूक्ष्म प्रमाणात हा परिणाम दिसतो. ह्या परिणामाचा त्यांनी सखोल अभ्यास करून त्याची समीकरणं मांडली. त्यालाच रामन्‌ विकिरण (रामन्‌ स्कॅटरिंग) किंवा रामन्‌ परिणाम (रामन्‌ इफेक्‍ट) म्हटलं जाते. या संशोधनासाठी सर सी. व्ही. रामन्‌ यांना वर्ष 1930 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पदार्थाच्या नमुन्याला जराही धक्‍का न लावता अत्यंत सूक्ष्म पातळीवर पदार्थाचे रासायनिक गुणधर्म तपासण्यासाठी रामन्‌ स्पेक्‍ट्रोस्कोपीमध्ये हा परिणाम वापरला जातो. जीवशास्त्रात शरीराच्या आतले नाजूक अवयव, प्रोटीन्स किंवा पेशी यांचं निरीक्षण करण्यासाठीही रामन्‌ मायक्रोस्पेक्‍ट्रोस्कोपी उपयुक्‍त ठरते. उंचावरून एखाद्या भागाचं सर्वेक्षण करताना पल्स लेसर वापरणाऱ्या लिडार तंत्रज्ञानात रामन्‌ इफेक्‍टचा उपयोग केलेला असतो. लिडारचा वापर भूशास्त्र, भूकंपशास्त्र, पुरातत्वशास्त्र, नकाशे बनवणे, वातावरणीय भौतिकी अशा अनेक शाखांमध्ये होतो. ग्राफीन या अतिपातळ, एका अणुइतक्‍या जाडीच्या पदार्थाच्या अभ्यासासाठी रामन्‌ इफेक्‍टचं तंत्रज्ञान योग्य ठरत आहे. तसाच वापर ऑप्टिकल ऍम्प्लिफायरमध्ये होतो आहे, तर लवकरच तो फायबर लेसर तंत्रज्ञानामध्ये होईल.

प्रकाशावर हे मौलिक संशोधन करण्याआधी बराच काळ सर रामन्‌ ध्वनीलहरी आणि त्यांचं कंपन याचा अभ्यास करत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून निवृत्त झाल्यावर वर्ष 1945 मध्ये सर रामन्‌ यांनी बेंगळुरू इथे रामन्‌ रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केली. शेवटपर्यंत तिथे डायरेक्‍टरचं पद भूषवत ते आपलं आवडीचं संशोधन करण्यात रमले होते. त्यांना विविधरंगी स्फटिकं, खनिजं, विविध प्रकारचे खडक गोळा करण्याचा छंद होता. हा त्यांचा संग्रहदेखील रामन्‌ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाहायला मिळू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा आणि विज्ञानाची गोडी लागावी यासाठी सर रामन्‌ यांच्या सन्मानार्थ नागपूर येथे रामन्‌ सायन्स सेंटर आणि प्लॅनेटोरियम उभारण्यात आलं आहे.

सर रामन्‌ यांच्या संशोधनाचं महत्त्व ओळखून अनेक वेगवेगळ्या देशातून त्यांना बहुमान लाभले. ब्रिटिश सरकारने त्यांना 1929 मध्ये “सर’ किताब देत गौरवलं, तर भारत सरकारने 1954 मध्ये “भारतरत्न’ सन्मान त्यांना प्रदान केला. सोविएत युनियनकडून त्यांना 1957 मध्ये लेनिन शांतता पुरस्कार मिळाला होता आणि अमेरिकेच्या 1941 च्या फ्रॅंकलिन मेडलचे ते मानकरी होते. रसायनशास्त्रातल्या संशोधनाच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या टप्प्यांची नोंद करण्याचं काम अमेरिकन केमिकल सोसायटीने वर्ष 1992 मध्ये हाती घेतलं. वर्ष 1998 मध्ये या संस्थेने रामन्‌ इफेक्‍टची विशेष नोंद घेत त्यांच्या संशोधनाचा गौरव केला आहे.

भारतात मूलभूत विज्ञान संशोधन (फंडामेंटल सायन्स रिसर्च) व्हावं आणि भारतीय संशोधकांनी उच्च दर्जाची कामगिरी करावी, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी ते तरुण संशोधकांना सतत प्रोत्साहन देत असत. या संशोधकांना मार्गदर्शन करायला परदेशातून वैज्ञानिकांना आमंत्रित करत असत.

सर रामन्‌ यांच्या स्मृतीनिमित्त 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करावा ही कल्पना नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्‍नॉलजी कमिशनची. भारत सरकारने त्याला मान्यता देत वर्ष 1986 मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस साजरा करताना फेब्रुवारीच्या त्या पूर्ण आठवड्यात विज्ञानविषयक भाषणं, रेडियो आणि टीव्ही प्रोग्राम, चर्चा आणि प्रदर्शनं अशा खास कार्यक्रमांची रेलचेल असते. विज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून उत्कृष्ट योगदान करणाऱ्या संवादकांना या दिवशी नॅशनल सायन्स पॉप्युलरायझेशन ऍवार्डर्स जाहीर करण्यात येतात. त्यानिमित्त दरवर्षी सरकारतर्फे एक थीम जाहीर केली जाते. या वर्षीची थीम आहे “विज्ञान लोकांसाठी आणि लोक विज्ञानासाठी.’ लक्ष्य आहे समाजाला विज्ञानाभिमुख करण्याचं. सर रामन्‌ यांना अपेक्षित असलेल्या तऱ्हेने सर्वांना विज्ञानाकडे वळवून संशोधनसाठी प्रवृत्त करण्याचं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)