नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गतीरोधकांच्या पट्ट्या तुटल्या 

आंबी खालसा (ता. संगमनेर) : पुणे-नाशिक महामार्गावर बसविण्यात आलेल्या गतिरोधकांच्या पट्ट्या तुटून गेल्या आहेत.

अपघातांचा धोका पुन्हा वाढला

संगमनेर – संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील अपघातांची शृंखला रोखण्यासाठी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बसवलेल्या गतीरोधकांच्या पट्ट्या काही ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे अपघातांचा धोका पुन्हा वाढला आहे.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरील आंबी खालसा परिसरात तीन महिन्यांपूर्वी लागोपाठ झालेल्या अपघातात तीन जणांना जीव गमावावा लागला तर चार जण गंभीर जखमी झाले होते. परिसरातील ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनी तब्बल तीन वेळा उग्र आंदोलन केले. घारगाव पोलीस, महसूल प्रशासन व आयएलएफएस कंपनीचे प्रकल्प संचालक लाल, पी. जी. खोडसकर, सहाय्यक कंत्राटदार दिलीप शिंदे, विभागीय अधिकारी संतोष मालुसरे यांच्याकडे महामार्गावरील आंबी खालसा फाटा, बोटा, घारगाव, खंदरमाळ फाटा (19 मैल), माहुली, साकुर फाटा, आनंद वाडी, वरुडी फाटा, गुंजाळ कॉलेज या अपघात प्रवण ठिकाणी गतिरोधक टाकण्याची व गावांना जोडणारे सर्व्हिस रोड, साईड गटारींच्या कामाची तातडीने मागणी केली होती.

आश्‍वासित कामांना अद्यापही फारशी गती आलेली नसून झालेली कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. बोटा बाह्यवळण रस्ता, आंबी खालसा, साकुर फाटा, आनंदवाडी या ठिकाणचे सर्व्हिस रोड अपूर्णावस्थेत आहेत. जास्त अपघात झालेल्या आंबी खालसा येथील तीव्र उतारावरील रस्त्यावरील गतीरोधकांच्या पट्ट्यामधूनच तुटल्याने गतीरोधक निकामी ठरले आहेत. वाहनांची गती वाढल्याने या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून कंपनीने टाकलेले बॅरिकेट्‌स तुटून गेल्याने अपघातांचा धोका पुन्हा वाढला आहे. संबंधित प्रशासनाने जनतेच्या धीराची अधिक परीक्षा न घेता तातडीने दुरुस्ती न केल्यास पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)