नरेंद्र पाटलांचा उमदेवारी अर्ज दाखल

हजारो कार्यकर्त्यांसह नेत्यांची उपस्थिती
मोठ्या फरकाने निवडून येण्याचा दावा

सातारा – महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल करण्यात आला. शिवसेना, भाजपसह मित्र पक्षांचे दिग्गज नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ना. दिवाकर रावते, ना. विजय शिवतारे, ना. नितीन बानुगडे-पाटील, ना.शेखर चरेगावकर, आ. शंभुराज देसाई, आ. निरंजन डावखरे, डॉ. अतुल भोसले, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, विक्रम पावस्कर उपस्थित होते.

साताऱ्यातील राजवाडा परिसरातून शनिवारी सकाळी 11 वाजता ढोल ताशा पथकांच्या गजरात रॅलीला सुरूवात झाली. पुढे मोतीचौक, पोलीस मुख्यालय मार्गावरून पोवईनाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली पोहचली. दरम्यान, रॅलीत नरेंद्र पाटील यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील या देखील सहभागी झाल्या होत्या. रॅलीमध्ये भाजप, शिवसेना मित्रपक्षांच्या युतीचा व नरेंद्र पाटील यांचा जयघोष करण्यात आला.

उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ना. रावते म्हणाले, शिवसेनेने यापुर्वी सातारा जिल्ह्यावर भगवा फडकवलेला आहे. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत निश्‍चितपणे होणार आहे. तसेच जिल्ह्याचे सुपुत्र स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना न्याय देण्याचे काम केले. आज त्यांचे सुपुत्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे नरेंद्र पाटील यांना निवडून देवून स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा सन्मान करण्याची संधी मतदारांपुढे आहे. ना. शिवतारे म्हणाले, जिल्ह्यातील जिहे-कठापूरसह वसना वांगणा योजना आघाडी सरकारच्या काळात प्रलंबित राहिल्या. या योजनांना गती देण्याचे काम युती सरकारने केले.

त्याचबरोबर साताऱ्यातील ग्रेड सेप्रेटर, मेडिकल कॉलेजला जमीन उपलब्ध करून देण्याचे श्रेय फक्त युती सरकारचे आहे. हे सातारकर जनतेने ओळखले आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी साताऱ्यासह जिल्ह्यातील मतदार पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्‍वास आहे. नरेंद्र पाटील म्हणाले, संपूर्ण ताकदीने आम्ही या निवडणुकीत उतरलो असून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी दिल्लीत जाणार आहे. जिल्ह्यातील मतदार महायुतीच्या पाठीशी उभे असून यंदाच्या निवडणूकीत ते मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून देतील, असे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)