नरेंद्र पाटील म्हणाले, एकच राजे बाबाराजे

शिवेंद्रसिंहराजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा नव्या चर्चांना सुरूवात
प्रसाद शेटे

मेढा – साताऱ्यातील एकत्रित मिसळीच्या आस्वादानंतर नरेंद्र पाटील व आ. शिवेंद्रसिंहराजे शनिवारी पुन्हा एकत्र आले. मेढा, ता. जावली येथे आयोजित कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी आ.शिवेंद्रसिंहराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर यावेळी आ. शिवेंद्रराजे समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी एकच राजे बाबाराजे, अशी घोषणाबाजी सुरू केली. पाटील यांनी कार्यकर्त्यांना साथ देत एकच राजे बाबाराजे घोषणा दिल्या. त्यामुळे आपसुकच सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा नव्या चर्चांना सुरूवात झाल्याचे दिसून आले.

मेढा, ता. जावली येथे शनिवारी आ. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी आ. शिवेंद्रराजे यांना पुष्पगुच्छ देवून व मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, बाबाराजे माझे फार जुने मित्र आहेत. माथाडी कामगारांच्या समस्येबाबत आम्ही एकत्र काम करतो. मेढा-जावळी भागामध्ये असणाऱ्या माथाडी मतदारांना नवी मुंबईमध्ये कोणतीही अडचण आली तर ते आवर्जून मला सांगत असतात व आम्ही तात्काळ ती समस्या सोडवितो. आज उमेदवारी अर्ज भरून मी इथे तातडीने उपस्थित राहिलो असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई रांजणे, ज्ञानदेव रांजने, ह.भ.प. सहास गिरी, धनंजय जांभळे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, फिरोज पठाण, विजय सुतार, मेढा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष पांडुरंग बापू जवळ, कांतीभाई देशमुख, नगरसेवक नारायण देशमुख, सुनीलनाना जवळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)