नरेंद्र मोदी भाजपचे शिशुपाल : कॉंग्रेस

कॉंग्रेसकडून पाच वर्षाच्या कारभाराचा पंचनामा करणारी पुस्तिका प्रकाशित

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपचे शिशुपाल अशी उपमा देऊन कॉंग्रेसने त्यांच्या 100 चुका मतदारांसमोर मांडल्या आहेत. मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या कारभाराचा पंचनामा करणाऱ्या “भाजपचा शिशुपाल मोदींच्या 100 चुका’ ही पुस्तिका शनिवारी कॉंग्रेसने प्रकाशित करत मोदींवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी कॉंग्रेसने पुस्तिकेचा आधार घेतला आहे. प्रदेश कॉंग्रेसने तयार केलेल्या या पुस्तिकेचे प्रकाशन पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, मधुसुदन मिस्त्री, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तिकेत अच्छे दिन, महागाई कमी करणे, दरवर्षी दोन कोटी रोजगार अशा आश्वासनांची पूर्तता न झाल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले. अच्छे दिनाचा नारा देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात कॉंग्रेसने उभारलेला विकासाच डोलारा मोदींच्या कार्यकाळात कोसळला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरूपाचा होता. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद कमी झालाच नाही उलट कोट्यवधी लोकांचा रोजगार बुडाला. 2008च्या जागतिक मंदीत तग धरून राहिलेली भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या तुघलकी निर्णयामुळे रूग्णशय्येवर पडली आहे.

राफेलच्या माध्यमातून मोदी भांडवलदार मित्रांचे हितसंबंध जपण्यासाठी कोणत्या थराला गेले हे समोर आले आहे. मोदींच्या आशीर्वादाने देशात धार्मिक उन्माद भडकविण्याचे काम नेटाने सुरू आहे, असा आरोप पुस्तिकेत करण्यात आली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शेतक-यांच्या उत्पादनाला दीडपट दर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, गेल्या पाच वर्षापासून शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत आहे. मोदी सरकारमध्ये शेती आणि शेतक-यांविषयी असणारी अनास्था हेच त्यामागील मुख्य कारण आहे, असे कॉंग्रेसने नमूद केले आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्यामुळे कर कमी होणे अपेक्षित होते. परंतु, जीएसटी लागू असलेल्या 115 देशांपैकी सर्वाधिक कर वसूल करणा-या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. जीएसटी कायद्याची चुकीची अंमलबजावणी केल्यामुळे व्यापारी आणि ग्रहकांना भुर्दंड बसल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)