पुणे – कस्टम नारकोटिक्स सेलने हडपसर गाडीतळ बस स्टॉप जवळ शनिवारी (दि.२०) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघा जणांना सापळा रचून ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ सात प्लॅस्टिकच्या बॅगमधे सुमारे १०६ किलो गांजा मिळाला असल्याची माहिती नारकोटिक्स कस्टम अधिकारी अलेक्झंडर ली यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना अलेक्झंडर ली यांनी सांगितले की, हडपसर गाडीतळ बस स्टॉप जवळ नारकोटिक्स विभागाची इस्पेक्टर प्रशांत मुकेश ,हवालदार संजय पिल्ले, सुनील कांबळे, रवी रणावरे आणि ड्रायव्हर सतीश पिंपळे यांच्या टीमने सापळा रचून फिरोज अब्दुल रज्जाक शेख व शाहरुख दिलावर तांबोळी (दोघे राहणार आष्ट ,तालुका मोहोळ ,जिल्हा सोलापूर) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ प्लास्टिकच्या सात बॅग आढळून आल्या पाहणी केली असता या बॅगमध्ये सुमारे एकशे सहा किलो गांजा हस्तगत झाला. हा माल वीस लाख रुपयाचा असल्याचे पिल्ले यांनी सांगितले अधिक तपास पुणे नारकोटिक्स विभागाची टीम करीत आहे.