पुत्र नितेश राणेंच्या ‘चिखलफेक’प्रकरणी नारायण राणेंची नाराजी; म्हणाले…

कणकवली – मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं नितेश राणेंनी आज आंदोलन केलं. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांचे वडील तथा राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना नारायण राणे यांनी, “कोणत्याही अधिकाऱ्यासोबत अशाप्रकारचे वर्तन करणे अत्यंत चुकीचे असून नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची सदर कृती निंदनीय आहे. द्रुतगती मार्गाबाबतचे आंदोलन जरी योग्य असले तरी त्यांनी केलेल्या कृतीचे मी किंचितही समर्थन करत नाही. वडील या नात्याने मी नितेश राणे यांना याप्रकरणी माफी मागण्यास सांगणार आहे.” अशी भूमिका मांडली.

दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी मध्यप्रदेशातील इंदौर येथे अशाचप्रकारे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना बॅटने हाणमार केली होती. सदर प्रकरणी आकाश विजयवर्गीय यांना ५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा देखील भोगावी लागली होती. अशातच आता महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारचे प्रकरण समोर आल्याने आमदार नितेश राणे यांच्यावर देखील कारवाई होणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)