#नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 2)

-सागर शहा (सनदी लेखपाल)

देशातील छोटे गुंतवणूकदार सामान्यतः अल्पबचतीच्या सरकारी योजना पसंत करतात. अधिक परतावा असणाऱ्या म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणुकीपेक्षा त्यांना सुरक्षितता आणि वेळेवर रक्कम मिळणे या प्रमुख गरजा वाटतात. अशा गुंतवणूकदारांमध्ये गेल्या सहा वर्षांमध्ये सातत्याने घट होत होती; कारण अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटत गेले. तथापि, या योजनांवरील व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे अल्पबचतीच्या या योजनांकडे पुन्हा एकदा लोकांचा कल वाढेल, अशी चिन्हे आहेत.

बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारखे कार्यक्रम सरकारने हाती घेतले; मात्र खास कन्यारत्नांसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरही इतर योजनांप्रमाणेच कमी होत चालले होते. ताज्या निर्णयामुळे बालिकांना आणि त्यांच्या आई-वडिलांना दिलासा मिळाला आहे. मुलीच्या नावाने अल्पबचत वाढविण्यास यामुळे प्रोत्साहन मिळेल. आपल्या देशातील लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती इतर देशांच्या तुलनेत अधिक असल्याचे पाहायला मिळते.

-Ads-

मात्र, सातत्याने घसरत चाललेल्या व्याजदरामुळे बचतसुद्धा फायदेशीर ठरेनाशी झाली होती. दुसरीकडे, कमालीची महागाई असल्यामुळे बचतीची प्रवृत्ती असूनसुद्धा अल्पबचत योजनांमधील गुंतवणूक रोडावत जाण्याचा धोका होता. काहीजणांनी म्युच्युअल फंडांसारखे मार्ग जवळ केले. मात्र, ज्यांना बचतीवरील परताव्यापेक्षा सुरक्षितता अधिक महत्त्वाची वाटते, अशा मध्यमवर्गीय बचत खातेधारकांची सर्वच बाजूंनी कोंडी झाली होती. अशा गुंतवणूकदारांना या निर्णयामुळे बचतीची नवी प्रेरणा मिळेल आणि इतरही अनेकजण पुनःश्‍च अल्पबचत योजनांकडे वळतील, असे या निर्णयावरून वाटते.

आता या बचत योजनांवरील व्याजदर बाजारपेठेतील महागाईच्या पातळीला टक्कर देण्याइतके होतील, अशी आशा आहे. सर्वसामान्य माणसाला आणीबाणीच्या प्रसंगी छोटी बचत ही संजीवनीसारखी वाटते. त्याचप्रमाणे अशा योजनांमधून बचतीच्या स्वरूपात येणाऱ्या प्रचंड निधीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होत असतो. अल्पबचत योजनांमधील घटत्या व्याजदरांमुळे शहरी भागांत शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल अधिक दिसू लागला होता; परंतु ग्रामीण भागात राहणारी 60 टक्के लोकसंख्या आजही बचतीसाठी पोस्ट खाते आणि अल्पबचत योजनांवरच अवलंबून आहे.

गेल्या सहा वर्षांपासून या लोकसंख्येच्या व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत होती. सेवानिवृत्त व्यक्तींना तर गुंतवणुकीवरील व्याज हेच कमाईचे प्रमुख साधन असते. त्यांना अधिक त्रास होऊ लागला होता. आता ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अल्पबचत योजनेवरील व्याजदरातही चांगली वाढ सरकारने केली आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक केल्यामुळे अधिक परतावा मिळत असला तरी या गुंतवणुकीमध्ये जोखीमही तेवढीच असते. ज्यांच्याकडे कमाईची मर्यादित साधने आहेत, त्यांना आपल्या बचतीचे पैसे जोखमीच्या ठिकाणी गुंतवणे पसंत नसते.

शेअर बाजारातील अनपेक्षित चढउतार आपण पाहतच असतो. शिवाय, अचानक होणाऱ्या चढउतारांकडे लक्ष ठेवण्यासाठी सेबीने हस्तक्षेप करावा आणि चुकीचे व्यवहार शेअर बाजारात होत असतील तर त्यावर लक्ष ठेवून छोट्या गुंतवणूकदारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अलीकडील काळात तज्ज्ञांकडून नेहमी केली जात होती. याचाच अर्थ, छोट्या गुंतवणूकदारांना जर जोखीम पत्करणे शक्‍य नसेल, तर त्यांना बचतीचा किफायतशीर मार्ग उपलब्ध असायला हवा. त्या दृष्टीने सरकारच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

#नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 1)    #नोंद – वाढ अल्प पण गरजेची (भाग 3)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)