कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरी

डॉ. सुजय विखे यांचा इशारा; विविध विकासकामांचा प्रारंभ

थापा मारण्यात मोदींचा क्रमांक पहिला

आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांमध्ये थापा मारण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रथम क्रमांक लागेल, अशी टीका करून दादा पाटील शेळके म्हणाले, “”नगर तालुक्‍यातील कॉंग्रेस खंबीरपणे विखे यांच्यामागे उभी आहे. नगर तालुका तुम्हाला मताधिक्‍य देईल. कॉंगेसचे तिकीट घेवून तुम्ही उभे राहा. भारतात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून याल; पण निवडून आल्यानंतर कधीही तुमच्या प्रचारात नसणारे आमच्यामुळेच तुम्ही निवडून आलात म्हणत तुम्हाला चिटकतील. तेव्हा तुमच्याबरोबर खरे कोण होते याची फक्त जाण ठेवा.” शेळके यांचा हा टोला आ.शिवाजीराव कर्डिले यांना होता.

नगर – कॉंग्रेस पक्ष माझ्या रक्तातच आहे. भाजप हा आमचा नंबर एकचा शत्रू आहे. भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार, असा सवाल पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केला. माझा पक्ष म्हणून मी कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणार आहेच; पण पक्षाने उमेदवारी नाही दिली, तर पक्ष, चिन्ह यांचे जोखड झुगारून पुढे जावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषद सदस्य अनिता हराळ यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी खडकी (ता. नगर) येथे डॉ. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. दादा पाटील शेळके होते. या वेळी कॉंगेस तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, अनिता हराळ, सदस्य प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, दत्ता नारळे, सरपंच अर्चना कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, बाबुर्डी बेंदचे उपसरपंच अण्णा चोभे, प्रवीण कोठुळे, हरिभाऊ निकम, बापूसाहेब कोठुळे, भास्करराव कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, ज्ञानदेव भोसले, शरद कोठुळे, अमृत कोठुळे, सुनील कोठुळे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. विखे म्हणाले, की भाजप हा कधीच शेतकऱ्यांचा पक्ष नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांविषयी कोणी बोलत नाही. येथील लोकप्रतिनिधींनाही शेतीतले काही माहीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे दु.:ख त्यांना कसे कळणार? येणारा काळ फार कठीण आहे. टॅंकर कोठून भरायचे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणीयोजना वाढत्या वीजबिलांमुळे अडचणीत आल्या आहेत. सौरऊर्जा हाच आता पाणी योजनांसाठी आधार असणार आहे. कर्जमाफी अटी शर्तीत अडकली, तशा आता जनावरांच्या छावण्यासाठी अटी शर्ती लावल्या जातील. जनावरांच्या शेणाचे परीक्षण करण्याची वेळ येईल, त्यावरून चारा कोणता दिला हे पाहिले जाईल आणि मगच बील दिले जाईल.

माझ्या आजोबांनी दक्षिणेत इतिहास घडवला, त्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहे. मी जिंकण्यासाठीच निवडणूक लढणार आहे. कुणाला पाडण्यासाठी नाही. सर्वात बोगस खासदार नगर दक्षिणेला मिळाला आहे. सभामंडपाच्या कामात दहा टक्के घेवून मंजुरी दिली जाते. पाच-पाच वर्षे खासदार गावांना भेटत नाहीत. आतून काम करतो, म्हणणारे पाकिटे घेवून गायब होतात, हे आम्हाला माहीत आहे, अशी टीका विखे यांनी केली.

या वेळी दगडू गायकवाड, डॉ. भीवसेन कोठुळे, वसंत कोठुळे, परशुराम तडके यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने तर अंगणवाडीसेवक विजया शिंदे आणि आदर्श शिक्षक नामदेव धामणे यांचा आदर्श कामाबद्दल सत्कार करण्यात आला. यानंतर डॉ. विखे यांनी बाबुर्डी बेंद येथे सदिच्छा भेट देत, बाबुर्डी घुमट, वाळकी, देऊळगाव सिद्धी वाळूंज येथेही कार्यक्रम घेतले.

साकळाईसाठी केंद्रातून निधी

साकळाई उपसा योजना हे माजी.खा. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न होते. साकळाईसाठी लोकप्रतिनीधींची मानसिकता काम करण्याची हवी.जिल्हा परिषद सदस्य हा विषय मांडू शकतात; पण पूर्ण करू शकत नाहीत. राज्य सरकारवर कर्जाचा एवढा बोजा वाढला आहे, की सहा महिन्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नसतील. त्यामुळे आमदार ती योजना करू शकणार नाहीत. त्यामुळे साकळाई उपसा योजनेसाठी केंद्रातून निधी आणावा लागेल. त्यासाठी त्या मानसिकतेचा माणूस संसदेत जायला हवा, असे मत डॉ. विखे यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री पराभूत होतील

पालकमंत्री त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास करू शकले नाहीत, तर जिल्हयात काय विकास करणार, असा सवाल करून डॉ. विखे म्हणाले, की कुकडीच्या पाण्याची घोषणा फक्त त्यांनी केली; पण त्यासाठी सरकारकडे पैसे आहेत का? कर्जत-जामखेड मतदारसंघात बदलाचे वारे वाहात आहेत. त्या ठिकाणी जर एकास एक लढत झाली, तर पालकमंत्री साठ हजार मतांनी पराभूत होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)