दुर्मीळ वनस्पतीचे “शिवसुमन’ नामकरण

जगभरात फक्‍त महाराष्ट्र राज्यातच आढळते रोपटे

पुणे – अतिधोकाग्रस्त प्रकारात असलेली आणि केवळ महाराष्ट्रात आढळणारी “फ्रेरिया इंडिका’ या दुर्मीळ वनस्पतीचे पर्यावरणप्रेमींतर्फे “शिवसुमन’ असे नामकरण करण्यात आले आहे. या वनस्पतीचे रक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी रायगडाच्या मार्गिकेतील डोंगर-उतार व कड्यांवर 50 हून अधिक रोपांचे रोपण करण्यात आले, अशी माहिती वनस्पती अभ्यासक आणि बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर यांनी दिले.

याबाबत डॉ. पुणेकर म्हणाले, “शिवसुमन या दुर्मीळ वनस्पतीची सर्वप्रथम शास्त्रीय नोंद ही “डालझेल’ नावाच्या शास्त्रज्ञाने शिवनेरी गडावरून केली होती. ही वनस्पती अतिधोकाग्रस्त असून जगभरात फक्त महाराष्ट्र राज्यातच आढळून येते. सह्याद्री पर्वतरांगामध्ये विशेषत: अहमदनगर (रंधा धबधबा), पुणे (जुन्नर: शिवनेरी गड, पुरंदर: वज्रगड, मुळशी: डोंगरवाडी, पिंपरीचे तळे), रायगड (शिवथरघळ), सातारा (महाबळेश्‍वर : केट्‌स पॉइंट, सज्जनगड), नाशिक (त्र्यंबकेश्‍वर, अंजनेरी), अशा निवडक ठिकाणी तीव्र डोंगर-उतार व कड्यावर आढळून येते. स्थानिक भाषेत काही ठिकाणी या वनस्पतीला “शिंदळ माकुडी’ म्हणून संबोधतात. पुणे जिल्ह्याचे निसर्ग प्रतीकात्मक मानचिन्ह फुल म्हणूनही ही वनस्पती ज्ञात आहे.’

या वनस्पतीच्या फुलाचा आकार सुदर्शनचक्राप्रमाणे असून त्याचा रंग भगवा-लाल असतो. या वनस्पतीचा दुर्मिळ आढळ व प्रदेशनिष्ठता ही सर्वच पार्श्‍वभूमी लक्षात निसर्गप्रेमींनी “शिवसुमन’ हे नाव सूचित केले. त्यासाठी तज्ज्ञांनीदेखील अनुमोदन दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)