सध्या नेल आर्ट करण्याची क्रेझ महिलावर्गात जरा जास्तच रंगलेली दिसतेय. सोशल मीडिया साइट्सवर तर नेल आर्टचे खास पेजसुद्धा आहेत. त्यांना तरुणी आणि महिलावर्गाकडून मिळणाऱ्या लाइक्स तर हजारोंच्या घरात आहेत. आकर्षक रंग आणि डिझाइन्स वापरून नखांवर केलेली ही कलाकुसर सगळ्यांनाच भुरळ पाडत असते. आपल्या नखांवरही अशा पद्धतीचं नेल आर्ट करून घेण्याची इच्छा एखादीला झाली नाही तर नवलच. नेल आर्ट करून घेणं खूप खर्चिक आहे. पण तुम्हाला कमी खर्चात एखाद्या प्रोफेशनलकडून करून घेतात तसं नेल आर्ट करून घ्यायचं असेल तर नेल स्टिकर्स’चा पर्याय एकदम बेस्ट आहे. तुम्ही घरच्या घरी आणि कोणतीही खटपट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं नेल आर्ट करून घेऊ शकता.
या नेल स्टिकर्समध्ये दोन पर्याय आहेत. एक म्हणजे छोटी डिझाइन्स आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या डिझाइन्स केलेल्या नखांच्या आकारातले स्टिकर्स. यातल्या छोट्या डिझाइन्समध्ये फ्लोरल प्रिंट, कार्टून, वेगवेगळ्या प्राण्यांच्या, माणसांच्या, पक्ष्यांच्या आकारातल्या नक्षीदार प्रिंट, मेंदीवरची अरेबिक नक्षी असं बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल. नखांवर नेल पेंटचा कोट दिला आणि तो वाळला की त्यावर असे छोटे छोटे स्टिकर्स वापरून कलाकुसर करता येते. हे स्टिकर्स दोन दिवसांपासून ते आठवडाभर नखांवर टिकतात. अर्थातच तुम्ही कोणत्या ब्रॅंडचे हे स्टिकर्स घेत आहात त्यावर त्यांचं टिकणं अवलंबून आहे. या छोट्या डिझाइन्स स्टिकर्स एका दिवसासाठी वापरायला ठीक आहेत. यात मोठमोठ्या ब्रॅंडचे स्टिकर्सही मिळतील. यांची किंमत 200 रुपयांपासून सुरू आहे आणि या छोट्या स्टिकर्समध्ये थ्रीडी स्टिकर्स देखील आहेत. यासाठी तुम्हाला तुमचं बजेट वाढवावं लागेल हे मात्र नक्की.
दुसरा पर्याय आहे तो नखांच्या आकारातल्या स्टिकर्सचा. हे तुम्ही कृत्रिम नखांवरही लावू शकता. हे स्टिकर्स नखांच्या आकारात कापलेले असतात. तुम्हाला फक्त हे व्यवस्थित नखांवर चिटकवायचे असतात. यात तर तुम्हाला शेकडो डिझाइन्स आणि वेगवेगळे रंग देखील मिळतील. सध्या या स्टिकर्सवर इंग्लिश अक्षरांचा किंवा शब्द असलेल्या प्रिंटचा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड नवा आहे आणि विशेष म्हणजे कॉलेज गोइंग तरुणींना हे स्टिकर्स नक्की आवडतील. लग्न किंवा पार्टीसाठी स्पार्कल्स किंवा पारंपरिक भारतीय नक्षी असलेल्या डिझाइन्सही या स्टिकर्समध्ये तुम्हाला मिळतील. यात हातांची नखं आणि पायांची नखं असा मिळून 20 नखांचा सेट येतो.
मध्यंतरी नखांना फ्रेंच शेप देण्याचा क्रेझ होता, पण कोणतीही स्टाइल खूप दिवस राहात नाही हे खरं, म्हणूनच सध्या नखांना ओव्हल शेप देण्याचा ट्रेण्ड इन आहे.
ओव्हलमध्ये शेप ठेवला तर त्यावर चेरी रेड, ब्लॅक रेड, होली रेड, ब्लड रेड रंगांचे नेलपेंट लावण्याचा ट्रेण्ड आहे. नेल आर्ट तसं बघायला गेलं तर सोपंही आहे आणि कठीणही. पण तुम्ही किचकट आर्ट करण्यापेक्षा काही सोप्या युक्त्या वापरल्यात तर तुमची नखं साधी आणि फॅशनेबलसुद्धा दिसतील.
नखांना कार्बन ब्लॅक रंग द्या आणि त्यांच्या टोकाला जर मेटालिक गोल्डन किंवा सिल्व्हर रंगाची शेड दिली तर ती अजून चांगली दिसू शकतात.
खूप किचकट नेल आर्ट करण्यापेक्षा आधी सोप्या पद्धती शिकून घ्या. तुमच्या नखांवर बेस म्हणून आवडीचा रंग द्या आणि तुम्हाला जर लाइन, चौकोन, आयत, त्रिकोण हवे असतील तर चिकटपट्टी त्या प्रकारात कापून नखांवर लावून घ्या. त्यावर तुमच्या बेसच्या विरुद्ध रंगाचं नेलपेंट लावा आणि नेलपेंट पूर्णपणे सुकल्यानंतर ती चिकटपट्टी काढा.
तुमच्याकडे जरा जास्त वेळ असेल तर झिरो साइजचा ब्रश आणि ऍक्रिलिक रंग घेऊन तुम्हाला हवं ते डिझाईन नखांवर काढू शकता. हे रंग सुकले की त्यावर ट्रान्सपरंट नेलपेंटचा कोट द्यायला विसरू नका, नाहीतर तुमची सारी मेहनत फुकट जायची. काहीच जमलं नाही तर टूथपिकच्या साहाय्याने नखांच्या टोकाला एखाद् दुसरा डॉट तरी काढा.
तुम्हाला अजून काही वेगळं करायचं असेल तर खाण्याचा चांदी किंवा सोन्याचा वर्ख ट्रान्सपरंट नेलपेंटच्या साहाय्याने नखांवर चिकटवून घ्या आणि त्यावर ब्लॅक किंवा रेड रंगाचं नेलपेंट लावा, त्यामुळे तुमच्या नखांना रॉयल इफेक्ट मिळेल. नखांवर कलाकुसर करायची हौस आहे, पण वेळच नाही, अशा वेळी तुम्ही सध्या बाजारात मिळणारे डिझायनर स्टिकर्स नखांवर चिकटवू शकता.
नखांना कोणतंच नेलपेंट न लावता फक्त टोकाला ग्लू लावून घ्या आणि स्पार्कल पावडर हलकेच त्यावर पसरा. जास्तीची पावडर झटकून टाका. मग ट्रान्सपरंट नेलपेंटचा कोट द्या.
– विजया जाधव
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा