आंध्रप्रदेशातील सभेत मोदींचा चंद्रबाबुंवर टीकास्त्र
मोदींच्या विरोधात आंध्रात मोठी निदर्शने
गुंटुर : गेली अनेक वर्ष तेलगु देसम पक्ष भारतीय जनता पक्षा बरोबर होता पण त्यांनी अलिकडेच एनडीएतून बाहेर पडून भाजपशी संबंध तोडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज येथे प्रथमच सभा झाली त्यावेळी बोलताना त्यांनी नायडुंवर जोरदार टीका केली. राजकारणात आपण मोदींपेक्षा ज्येष्ठ आहोत असा दावा नायडू कायम करीत असतात पण ते पक्ष बदलण्यात आणि विश्वासघात करण्यात माझ्या पेक्षा ज्येष्ठ आहे अशी टीका मोदींनी त्यांच्यावर केली.
नायडू यांनी आपले सासरे एन टी रामाराव यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्ष ताब्यात घेतला होता हा इतिहास येथील जनता विसरलेली नाही. त्यांची आंध्रातील लोकप्रियता आता झपाट्याने घसरणीला लागली आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला. आंध्रात सनराईज करू अशी घोषणा करणारे नेते आता केवळ आपल्या मुलाच्या प्रमोशन मध्ये गुंतले आहेत असे ते म्हणाले.
अमरावतीच्या विकासाऐवजी ते आता स्वताच्या विकासात व्यस्त आहेत असा आरोपही मोदींनी नायडू यांच्यावर केला. दरम्यान मोदी सरकारने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा नाकारल्याने त्यांच्या विरोधात त्या प्रदेशात मोठी निदर्शने करण्यात आली. ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून त्यांना विरोध करण्यात आला. नो मोअर मोदी, मोदी नेव्हर अगेन अशा घोषणांचे फलक तेथे त्यांच्या विरोधात फडकवण्यात आले.
मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की दुसऱ्यांवर बेफाट आरोप करून पळून जाणे अगदी सोपे असते. त्यांनी आमचे राज्य वेगळे केले. आणि आम्हाला फसवले. या राज्य दुफळीच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. त्यांनी स्वताही या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती पण त्यांनी आमची फसवणूकच केली आहे असेही नायडू यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा