पळवे-कडूस रस्त्यावरील खड्डे बुजविण्यातही भ्रष्टाचार- दरेकर

सुपे – पारनेर तालुक्‍यातील रस्त्याच्या कामात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढतच आहे. याकडे लक्ष देण्यास तालुक्‍यातील पुढाऱ्यांसह प्रशासनाला वेळ मिळत नाही. शासनाने करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यावर तीनच महिन्यात डागडूजी करण्याची वेळ येत असल्याने हा निधी पाण्यात जात आहे, अशी माहिती सेवा समितीचे तालुका सचिव सुदाम दरेकर यांनी दिली.

तालुक्‍यातील पळवे कडूस रस्त्यावरिल खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. साईड पट्ट्याला फक्त मलम पट्टी करण्यात येत असून पळवे कडूस या रस्त्यासाठी अडीच लाख रुपये खर्चातून रस्त्यावरील खड्डे व साईडपट्टयाचे काम करण्यात येणार आहे.

“सदर काम हे पळवे ग्रामीण उपकेंद्रापर्यंतच आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये मंजूर आहेत. साईड पट्‌टयांचे काम त्यामध्ये नव्हते. साईडपट्यांवर प्रारंभी मातीमिश्रित मुरूम टाकला आहे. आज जेसीबीच्या साह्याने साईडपट्यांवर मुरूम टाकण्यात येणार आहे. – नानाभाऊ गाडिलकर, सरपंच, पळवे कडूस

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यादरम्यान खड्डयात कुठे भर तर कुठे साधी माती लाऊन साईड पट्ट्याला डांबर खडीची भर देवून डागडूजी व साईडपट्ट्याचे काम सुरु झाले असले तरी, काही ठिकाणी कडा फुटलेल्या अवस्थेत ठेऊन त्यावर माती भरण्याचे काम सुरू आहे.
या रस्त्याचे नुकतेच जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे हस्ते कामाचा आरंभ झाला आहे. या रस्त्याचे काम होणे अत्यंत महत्वाचे होते. या ठिकाणाहून ग्रामीण भागातून सुपे-शिरूर-पारनेर या ठिकाणी शाळा कॉलेज व उद्योग व्यवसायासाठी लोकांची ये जा असते.

शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल विक्रीसाठी मेन बाजार पेठ असलेल्या शिरूर, सुपे, नगर, पुणे या ठिकाणी विक्रीसाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. यासह परिसरात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. बऱ्याचदा पुढाऱ्यांकडून या रस्त्याचा नारळही फोडला, मात्र संपूर्ण रस्ता न होता, केवळ डागडुजी व साईड पट्या भरणे काम मंजूर होऊन काम सुरू झाले.

साईड पट्ट्याला चांगल्या प्रतीचा मुरूम न टाकता फक्त शेतातील माती व बाजूची माती टाकून काम सुरू केले आहे. हे काम निकृष्ट प्रतीचे आहे. कामाच्या पद्धतीत बदल न झाल्यास माहिती सेवा समिती या विरोधात तक्रार करणार असल्याची माहिती तालुका सचिव सुदाम दरेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)