अस्तित्वाच्या लढाईत कॉंग्रेस तरणार का?

विखे, तांबेंवर महापालिका निवडणुकीची भिस्त : आघाडीच्या जागा वाटपात कॉंग्रेसची नमती भूमिका

कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव

माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याच्या नेतृत्वामुळे शहरात कॉंग्रेसला बरे दिवस होते. परंतू त्यानंतर शहरात कॉंग्रेसला नेतृत्वच न मिळाल्याने आज पक्षाची नौका बुडायला लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या रुपाने पक्षाला नेतृत्व मिळाले असे वाटले होते. परंतू तांबे शहरात रमले नाही. त्यात विखे व थोरात या गटात कार्यकर्ते विभागले गेल्याने एक नेतृत्व राहिलेच नाही.

नगर : नगर शहरात औषधालाही न उरलेल्या कॉंग्रेसची उभारणी करण्याची वेळ पक्षश्रेष्ठींवर आली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकविण्याची कसरत युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व डॉ. सुजय विखे यांना करावी लागणार आहे. अर्थात शहर कॉंग्रेस अस्तित्वहिन झाल्याने महापालिका निवडणूक देखील पक्षाने फारशी गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसत आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीशिवाय कॉंग्रेसला पर्याय राहिलेला नाही. त्यातून जागा वाटपात पक्षाकडून नमती भूमिका घेतली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. तेथेही पक्षाच्या अस्तित्वाची लढाई तांबे व विखेंना करावी लागणार आहे. हे सर्व करण्यासाठी या दोन्ही नेत्यांना शहरासाठी वेळ द्यावा लागणार आहे.

कॉंग्रेस वगळता अन्य प्रमुख शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीची तयारी यापूर्वीपासून सुरू केली आहे. परंतू कॉंग्रेसकडून अद्यापही वरवर तयारी केली जात आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसची राज्यात सत्ता होती. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेत्यांकडे मंत्रीपद असल्याने त्यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी कसुन प्रयत्न केले. तेव्हा 11 जागा मिळाल्या होत्या. आताही या दोन्ही नेत्यांवरच निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

परंतू अद्यापही या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून निवडणुकीचे नियोजन केलेले नाही. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी महिन्यापूर्वीच ना. विखे व आ. थोरात यांना महापालिका निवडणुकीकडे लक्ष देण्याची सुचना केली होती. परंतू निवडणुकी कार्यक्रम जाहीर होवून दहा दिवस झाले तरी अद्यापही हे दोन्ही नेते शहराकडे फिरकले नाहीत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी या निवडणुकीचे किती गांभीर्य घेतले हे लक्षात येते.

या दोन्ही नेत्यांसह कार्यकर्त्यांध्ये समन्वय साधण्यासाठी सत्यजित तांबे यांची समन्वयक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. त्या नियुक्‍तीनंतरही तांबे शहरात फिरकले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना सध्याही कॉंग्रेस ही निवडणूक लढणार आहे की नाही असा प्रश्‍न पडला आहे. डॉ.सुजय विखे यांनी फारसे शहरात लक्ष दिलेले नाही. मध्यतंरी त्यांनी आघाडीबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चा केली. परंतू त्याला तांबे यांना बोलविले नव्हते.

केडगावमध्येही कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्‍न

शहरात केडगाव हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतू तेथेही आता पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीत एकहाती कॉंग्रेसच्या जागा या केडगावात मिळत होत्या. परंतू आता तशी स्थिती राहिली नाही. सध्या तरी उमदेवारांचा शोध घेण्याची वेळ पक्षाला आली आहे.

त्यामुळे तांबे यांची समन्वयक म्हणून नेमकी काय भूमिका आहे, हे देखील अद्याप स्पष्ट होत नाही. अर्थात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तांबे यांनी तसा शहराशी संपर्क कमी केला होता. कार्यालयाच्या माध्यमातून काय तो संपर्क होता. सध्या तरी तांबे हे मुंबईतून महापालिका निवडणुकीची प्रक्रिया राबवित आहेत.

डॉ. सुजय विखे यांनी शहरात गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी चांगला संपर्क ठेवला होता. परंतू लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून वरवर संपर्क ठेवला आहे. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या माध्यमातून काय ती निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले असून ते प्रदेशकडे पाठविण्यात आले आहे. मध्यतंरी तांबे यांची समन्वयक म्हणून नियुक्‍ती झाल्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाला 32 जागा मिळतील, असा दावा तांबे यांनी प्रदेशकडे पाठविलेल्या अहवालातून केला होता. परंतू आता तो दावा फोल ठरला आहे.

आता कॉंग्रेसने केवळ 25 जागांचा दावा केला असून तेवढ्याच जागा राष्ट्रवादीकडे मागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातून चर्चेत त्या जागा कमी होण्याची शक्‍यता आहे. सध्यातरी तांबे, विखे यांच्यात एकत्रित नियोजनाचा अभाव आहे. डॉ.विखे हे लोकसभेचा विचार करून आपली रणनिती ठरवित आहेत. तर तांबे हे देखील पुढील विधानसभेची समिकरणे मांडत आहे.अर्थात दोघांकडूनही आगामी निवडणुकांचा विचार होत असल्याने महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे चिन्ह नगरकरांपर्यंत पोहचविण्याची संधी आहे. परंतू पक्षाची ताकद पाहता गेल्या निवडणुकीप्रमाणे तरी जागा पक्षाला मिळणार का असा प्रश्‍न आहे. त्यामुळे आघाडीशिवाय पर्याय नाही.

शहर व उपनगरात कॉंग्रेस बोटावर मोजता येईल, एवढीच कार्यकर्त्यांची फौज राहिली आहे. अशा स्थितीत महापालिका निवडणुकीला समोरे जावून पक्षाचे अस्तित्व टिकविण्याची लढाई आता विखे व तांबे यांच्या नेतृत्वाखाली करावी लागणार आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही महापालिका निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच पक्षाच्या अन्य स्थानिक नेत्यांनी ती केलेली नाही. विखे व थोरात यांच्यातील संघर्ष जिल्ह्याला सर्वश्रृत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाला किती यश मिळणार हे या दोन्ही नेत्यांवर अवलंबून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)