सर्वोच्च न्यायालयाचा नागेश्वर राव यांना दणका !

केंद्र सरकार आणि सीबीआयला फटकारले

नवी दिल्ली: बिहार येथील मुझफ्फरपूर वसतीगृहातील लैंगिक शोषण प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना पुढील सुनावणीसाठी 12 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली केल्याबाबत आजच न्यायालयाने केंद्र आणि सीबीआयला फटकारले आहे.

गतवर्षी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयकडून सुरु आहे. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले आहेत. मात्र, यानंतरही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. याची न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आला असून आम्ही याची गंभीर दखल घेत आहोत, असे न्यायालयाने सांगितले.

ए. के. शर्मा यांच्या बदलीसाठी कारणीभूत कोण, असा सवाल न्यायालयाने विचारला असता नागेश्वर राव हे संचालकपदी असताना हा निर्णय घेण्यात आला होता, असे सीबीआयच्या वकिलांनी सांगितले. यावर न्यायालयाने ताशेरे ओढले.
आता फक्त देवच तुमची मदत करु शकतो, असे सांगत नागेश्वर राव यांना हजर राहण्याचे आदेश दिले. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु केली जाईल. तसेच या प्रकरणाची सुनावणी बिहारऐवजी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयात घेण्याचे आदेशही दिले. या प्रकरणाची सुनावणी सहा महिन्याच्या आतच पूर्ण करावी, असे निर्देशही दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)