पिंपरी – पिंपळे निलखचे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौर राहुल जाधव यांच्याकडे सोपविला आहे. वैयक्तिक कारणामुळे या समितीवर काम करणे शक्य नसल्याने राजीनामा देत असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. महापालिकेतील भाजप सत्तेला अडीच वर्ष पूर्ण होत आली. तरी, कामठे यांना वृक्ष प्राधिकरण समितीशिवाय दुसरे कोणतेही पद मिळाले नाही. याच नाराजीतूनच कामठे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या दोन वर्षांपासून राजीनामा सत्र सुरुच आहे. नगरसेवक शीतल शिंदे यांच्या विधी समिती सदस्यत्वाच्या राजीनाम्याने याला सुरुवात झाली. त्यानंतर राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधी समितीसाठी इच्छुक असलेल्या अश्विनी बोबडे यांची क्रीडा समितीवर वर्णी लागल्याने त्यांनी नियुक्तीनंतर पाचच मिनिटात क्रीडा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
तत्पूर्वी जाधववाडीचे वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कासारवाडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता तुषार कामठे यांची त्यामध्ये भर पडली आहे. त्यांनी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन वर्षांपासून सदस्यत्वाची जबाबदारी निष्ठेने सांभाळली. परंतु, वैयक्तिक कारणास्तव वृक्ष समिती सदस्यत्वास पूर्णपणे न्याय देणे शक्य नाही. त्यामुळे कार्यमुक्त करण्याची विनंती त्यांनी महापौरांना केली आहे.