नगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको 

खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको 

आज स्वच्छ प्रतिमांचा एकही नगरसेवक उरलेला नाही. मी आयुष्यभर नोकरी करून केवळ 7 लाख रूपये फंड कमविला, हे एका निवडणुकीला 50 ते 60 लाख रूपये कसे घालतात, एकमेकांवर खुर्च्या फेकणारे नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवकांना नको आहेत. राजदंड घेवून पळतात, आणि गर्वाने सांगतात, की आम्ही राजदंड पळविला. काहिशी लाज वाटू द्या. जो राजदंड आपल्याला निती शिकवितो, तोच आपण पळवितो. हे पळविण्यात कसला गर्व.

– अच्युत दसरे, टांगे गल्ली 


प्रौढ मंचाची स्थापना करावी 

प्रौढ मंच महापालिकेने स्थापन करावा. ज्येष्ठांचे काही महत्वाचे प्रश्‍न असतात, त्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी नगर कसे स्वच्छ कसे राहील, त्याचबरोबर विकासकामांसाठी ज्येष्ठांकडेही अनेक कल्पना असतात, त्यांना ते मांडण्यासाठी व्यासपीठाची गरज आहे. त्यांना ते उपलब्ध करून द्यावे.

– रंगनाथ सांगळे, चितळे रोड 


नगरसेवक प्राणी पाच वर्षांनी येतो 

तक्रारी तरी किती सांगू, ड्रेनेज लाईन हवी, कचरा गाडी येत नाही, झाडू मारणारे येत नाहीत, मुलांना खेळायला मैदाने हवेत, अशी आश्‍वासने सर्व नगरसेवक देतात, मात्र ते पाळत कोणीच नाहीत. नगरसेवक हा एकमेव प्राणी आहे, जो पाच वर्षानंतरच तोंड दाखवतो. किमान एक-दोन महिण्यात येऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घ्याव्यात.

– शिवलिंगप्पा अतनूर, वसंत टेकडी 


मैदाने व तालीम उपलब्ध करुन द्यावी 

या परिसरात व शहरात चांगले रस्ते करावेत. रस्त्यावर सर्वत्र पथदिवे बसवावेत. आज आपल्या शहरात खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. मैदाने उपलब्ध करुन द्यावीत. मी स्वत: जमीन घेऊन तालीम बांधली आहे, आजूबाजूच्या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. जर हे काम मी एक सामान्य नागरिक म्हणून करु शकतो, तर महापालीका का नाही करु शकत ?

– भाऊसाहेब करंजुले, फकीरवाडा 


रस्त्यांची दुरुस्ती करावी 

या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे अनेकदा अपघात होतात. या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. प्रवासी तसेच दैनंदीन फिरतीची कामे करणाऱ्यांना अशा खड्डेमय रस्त्यांमुळे सतत्याने मणक्‍यांचे आजार उद्‌भवतात. यावर “सुज्ञ’ नगरसेवकांनी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत.

– संतोष कासवा, निंबाळकर गल्ली 


उद्योग-धंद्यांची संख्या वाढवावी 

शहरामध्ये व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र्य संकुल असावे. शहरात नवीन उद्योगधंद्याची संख्या वाढवणे आवश्‍यक आहे. आज अनेक तरुण नोकरीच्या शोधात दुसऱ्या शहरात जात आहेत. तरी स्थानिक तरुणांना शहरातच नोकरीची संधी उपलब्ध व्हावी.

– प्रकाश भालेराव, सबजेल चौक 


पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे 

या परिसरात पाणी वेळेवर येत नसल्याने अनेकदा पाणी आल्यानंतर धांदल उडते. कामानिमीत्त बाहेर असणाऱ्या महिलांना अनेकदा पाण्यापासून वंचीत रहावे लागते. या परिसरात पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे.

– अमृता नगरे, बालिकाश्रम रोड 


मूलभूत सुविधा नाहीत 

या परिसरात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे या भागात कचरागाडी येत नाही. तसेच परिसरात कचराकुंड्याही नसल्याने अस्वच्छता पसरली आहे. या परिसरात पथदिवेही नाहीत. मोकाट कुत्र्यांचेही प्रमाण जास्त आहे. हा परिसर शहरापासून दूर अंतरावर असल्याने येथील नागरिकांना स्वतंत्र वाचनालयाची आवश्‍यकता आहे.

– शीतल भोसले, बोल्हेगाव 


गरिबांच्या गरिबीशी खेळू नका 

तोंड दडवायला महापालिकेने घर तर बांधलं, मात्र त्याच्या चाव्या हातात दिल्याच नाही. मनपालिकेमध्ये जाऊन त्यांच्या पायऱ्या झिजविल्या मात्र, त्याचा काहिच उपयोग झाला नाही. माझं एकच सांगणं आहे, महापालिकेने गरिबांच्या गरिबिशी कधीच खेळू नये, या प्रकरणाची चौकशी व्हावी.

– वसंत कुलकर्णी, महाजन गल्ली 


रस्त्याची डागडुजी करावी 

या परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. या रस्त्यांची डागडूजी न केल्याने या खड्ड्यात पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरते. तरी पालीकेने या भागातील रस्ते दुरुस्त करावेत.

– स्मिता कुलकर्णी, एकवीरा चौक 


पोलिसांनी गस्त वाढवणे आवश्‍यक 

या परिसरात पोलिसांची गस्त नसल्याने घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या भागात पोलिसांनी गस्त वाढवणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे.
– लता बर्वे, नामदेव चौक एकवीरा चौक 


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)