नगरकर बोलू लागले…विकासात्मक कामांकडे लक्ष द्यावे

विकासात्मक कामांकडे लक्ष द्यावे

नीलक्रांती चौक परिसरामध्ये मागील दहा वर्षात महापालिकेतर्फे सार्वजनिक शौचालय, लाईट व पाण्याची सोय नाही. या भागामध्ये विकासाच्या दृष्टीकोनातून कामे होणे अत्यंत आवश्‍यक आहेत. या निवडणूकीमध्ये माझी कोणत्याही पक्षाला मतदान करण्याची इच्छा नाही. सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून निवडणूकीपूर्वी कामे करू अशी आश्‍वासने दिली जातात, मात्र नंतर पूर्ण कोणीच करत नाही. त्यामुळे मी नोटा दाबण्याचा निर्णय घेतला आहे.
– करण साळवे, नीलक्रांती चौक परिसर


कचरा व्यवस्थापन करणे आवश्‍यक

मी कोर्ट गल्ली परिसरात राहते. या परिसरामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कचरा अधिक प्रमाणात साठला जातो, मात्र तो उचलला जात नाही. त्या कचऱ्यावर माशा, भटके कुत्रे त्यामुळे येथील नागरिकांच्या तसेच बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच कोर्ट गल्ली ते दिल्ली गेट अरुंद रस्ता असल्यामुळे कायम वाहतुकीची कोंडी झालेली पहावयास मिळते. त्यामुळे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. परिसरात पाणी येण्याचा नियमित वेळ नाही. रात्री 3 वाजता पाणी येते, हे चित्र बदलायला पाहिजे.
– अनिता बारस्कर, जुनी कोर्ट गल्ली परिसर


साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय करावे

आताच्या नगरसेवकांनी कामे उत्तम प्रकारे केलेली आहेत. मात्र सीना नदीचा प्रश्‍न अजूनदेखील प्रलंबित आहे. पहाटेच्या वेळी नदीच्या पाण्याची दुर्गंधी येते. श्‍वास घेणेही कठीण होते, या अशुध्द पाण्यामुळे नालेगाव परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे डेंगी व मलेरीया असे घातक आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यावर महापालिकेकडून काही प्रतिबंधात्मक उपाय होत नाहीत.
– हृषीकेश मंडलीक, नालेगाव परिसर


व्यापारी धोरणांविषयी सकारात्मकता दाखवावी

शहरातील मनपाचे गाळे संबंधित ठोस निर्णय घेऊन गाळेधारकांना न्याय देण्याचे काम करावे. व्यापारी धोरणांविषयी महापालिकेमार्फत सकारात्मक धोरणांचा अवलंब केला पाहिजे. रंगभवन शॉपिंग सेंटरसमोर स्पिड ब्रेकर टाकणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.
– सब्बन शिरीष, सर्जेपुरा परिसर

 


मूलभूत सुविधा पुरवाव्यात

शहरात कचरा, पाणी, रस्ते, परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या परिस्थितीवर उपाययोजना महापालिकेमार्फत केल्या जाव्यात. शहरामध्ये प्राथमिक सुविधा देणे गरजेचे आहे. प्रौढ व्यक्‍तींसाठी बसण्यासाठी बाकडे, बेंच तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानांची आवश्‍यकता आहे. महापालिकेमार्फत या सुविधा पुरविल्या जाव्यात.
– बालाजी म्याना, सावेडी परिसर

 


निवडणुकीनंतर नम्रता ठेवावी

उमेदवार सुशील, सामाजिक भान जपणारा, आणि जाणीव असणारा हवा. निवडणूक होण्यापूर्वी ज्याप्रमाणे उमेदवार मतदारांचा आदर करतात, ज्या नम्रतेने आणि हक्काने मतं मागतात, तोच नम्रपणा, तोच मतदारांविषयीचा आदर, उमेदवारांनी निवडून आल्यावरही ठेवायला हवा, मात्र निवडणुकीपूर्वीचे चित्र आणि नंतरचे यामध्ये अधिक प्रमाणात बदल दिसून येतो, नागरिकांचे प्रश्‍न वेळोवेळी सोडवून, त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवावे, जेणेकरून तोच विश्‍वास नागरिकांना पुढच्या उमेदवारांवर टाकता येईल. अन्यथा पदावरून पायउतार करायला मतदारांना वेळ लागणार नाही.
– केदार पवार, घुमरे गल्ली


सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

नालेगाव परिसरामध्ये बाजार भरतो, त्या ठिकाणी कचरा अधिक प्रमाणात पडलेला दिसून येतो, बाजारात विक्रेत्यांचा उरलेला, तसेच खराब झालेला पालेभाज्या, फळभाज्या फेकून दिल्या जातात, त्यामुळे तेथे कचऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर परिसरामध्ये काही प्रमाणात पथदिवे आहेत, मात्र काही ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत आहेत. पावसाळ्यामध्ये या परिसरातील ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुंबलेली दिसून येते, त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात. बाजार भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत, त्यामुळे बाजारामध्ये होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालता येईल.
– तुषार देशमुख,नालेगाव


रस्त्याच्या कामांचा हिशोब द्या

गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी व त्यानंतर शिवसेनेचा महापौर होता. या दोन्ही सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येकी अडीच वर्षांत अनेक रस्त्यांची कामे झाली आहे. राष्ट्रवादीने मूलभूत सुविधा योजनेतून तब्बल 40 कोटी रस्त्यांची कामे केली असा दावा ते करीत आहे. मग त्या रस्त्यांचा हिशोब त्यांनी नगरकरांना द्यावा. झालेल्या रस्ते यादीत घेवून नव्याने रस्ते झाल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबत त्यावेळी विरोधकांनी त्यांचे सत्य उघड केले होते. शिवसेनेच्या काळात रस्त्यांची कामे झाली. रस्त्यांवरील खड्डे बुजविले. पण आजही रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर रस्त्यांची कामे झाली आहे की नाही. असा प्रश्‍न पडतो.
– कामरान शेख, झेंडीगेट


पथदिव्यांच्या घोटाळ्याचे पुढे काय?

शिवसेनेच्या काळात शहरातील पथदिव्यांचा घोटाळा बाहेर पडला. 40 लाख रुपयांचा हा घोटाळा असतांना त्याचे पुढे काहीच झाले नाही. ते आरोपी होते. ते आज मोकाट फिरत आहे. केले कोणी त्याचे नाव पुढे आहे नाही. केवळ राष्ट्रवादी व शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप झाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. पण ज्या पदाधिकाऱ्यांच्या काळात हा घोटाळा झाला. त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हे दुदैवीच आहे.
– हरिश भामरे, सारसनगर

(संकलन- प्रल्हाद एडके, सागर गोरखे, गणेश बोरुडे, वेदकुमार कुलकर्णी)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)