जिल्हा परिषदेवर अनियमिततेचा ठपका

शिक्षण, समाजकल्याण, बालकल्याण, बांधकामची मुंबईत चौकशी

दोन महिन्यात कार्यवाहीचा अहवाल

पंचायत राज समितीला आढळून आलेल्या आक्षेपाबाबत तसेच कामकाजातील अनियमितेबाबत इतिवृत्तामध्ये नोंद घेण्यात आली आहे. दोन महिन्यात कार्यवाहीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानुसार कोणावर काय कार्यवाही करावी लागणार आहे. त्याची अंमलबजावणी होईल. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी जबाबदारी निश्‍चित केली आहे.

नगर – नगर जिल्हा परिषदेच्या कामकाजाची गंभीर दाखल पंचायत राज समितीने घेतली असून जिल्हा परिषदेवर अनियमितेबरोबर गैरव्यवहाराचा ठपका समितीने ठेवला आहे. समिती येणार असे समजताच गेल्या तीन ते चार वर्षांपासून धुळखात पडलेले लाभार्थ्यांच्या साहित्यांचे तातडीने करण्यात आले. ही गोष्ट समितीला खटकली आहे.

-Ads-

या विषयास शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच बांधकाम विभागातील अनियमततेबाबत मुंबईत अधिकाऱ्यांची चौकशी (साक्ष) केली जाणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख आ. सुधीर पारवे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.

पंचायत राज समितीचे प्रमुख आ.पारवे यांच्यासह 21 आमदार सदस्यांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या तपासणीसह नगर जिल्ह्यात दौऱ्यावर होते. सन 2013-14 चे लेखा परिक्षण व सन 2014-15 चा वार्षिक प्रशासन अहवाल यातील आक्षेपांच्या तपासणीवर चर्चा केली. समितीच्या सदस्यांनी गुरुवारी तालुकानिहाय पंचायत समितीला भेट देवून तपासणी केली. तालुक्‍यातील शाळा, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी आदिंना भेटी दिल्या. समितीने आज शनिवारी जिल्हा परिषदेत वार्षिक प्रशासन अहवालावर चर्चा केली. त्यानंतर आ. पारवे हे पत्रकारांशी बोलत होते.

उत्पन्न वाढीसाठी बीओटी

जिल्हा परिषद व पंचायत समितीला उत्पन्न वाढीसाठी बीओटीचा प्रकल्प महत्वाचा आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेवर व्यापारी संकुल उभारून उत्पन्न वाढीचा प्रयत्न करता येईल. पण तसे होत नाही. असे आ. पारवे म्हणाले.

ते म्हणाले की, जिल्हा परिषदांचे अस्तित्व टिकविण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकशाहीने अनेक अधिकार दिले आहे. परंतू जिल्हा परिषद या अधिकाराचा वापर करीत नाही. त्यामुळे अन्यायाची भावना व्यक्‍त होते. आतापर्यंत 14 जिल्हा परिषदांची तपासणी केली आहे. ही तपासणी करण्यापूर्वी विभागीय आयुक्‍तांची साक्ष घेतली. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या 1 लाखांवर आक्षेपांची पूर्तता झालेली नाही. लेखा परीक्षण व विभागीय आयुक्‍त यांच्या आक्षेपांत तफावत पडते आहे. विभागीय आयुक्‍त जिल्हा परिषदेवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडत आहेत.

ते तत्काळ कारवाई करत नाहीत. त्यामुळे या समितीने विभागीय आयुक्‍तांचीही साक्ष घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे 1 हजार 700 आक्षेप निकाली काढले गेले आहे. राज्य व केंद्र सरकार देत असलेला निधी गाव व लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. पंचायत समित्यांच्या अंदाजपत्रकांनाही शिस्त लावण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अन्य अधिकाऱ्यांनी नियमित भेटी दिल्या पाहिजेत.

अफरातफरीला एकटा ग्रामसेवक जबाबदार आहे असे नाही तर निधी देणारे सहायक लेखा अधिकारी व गट विकास अधिकारी हेही जबाबदार आहेत. यासंदर्भात योग्य पध्दतीने कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्‍त करताना त्यांनी समितीचा दौरा जाहीर झाल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. त्यापूर्वीच ती होणे अपेक्षित होते असे सांगत नापसंती व्यक्‍त केली.

निधी जमा केल्याची चौकशी- पारवे

अध्यक्ष या नात्याने मी तसेच समितीने पैसे गोळा करण्यास सांगितले नाही. परंतु आमच्या नावाखाली जर निधी संकलन झाले असेल तर चौकशी केली जाईल. जाहीरपणे तपासणी करुन कोणावर कारवाई करणार हे सांगितले आहे. त्यामुळे आमचा दौरा पारदर्शक होता.”जो खाईल तो खाली पाहील’ अशी म्हण आहे. मी तर सरकारी विश्रामगृहात राहिलो. काही आमदारांची हॉटेलमधून व्यवस्था करण्यात आली. यासाठी खास शासनाकडून निधी जिल्हा परिषदेला आला आहे. त्यामुळे आम्ही पैशाची मागणी केली नाही. त्यामुळे असा निधी जमा केल्याची चौकशी करणार असल्याचे आ. पारवे म्हणाले.

शालेय पोषणची चौकशी

शालेय पोषण आहारबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. शासनाने आहाराचा करारनामा केला असला तरी तो शिक्षक व मुख्याध्यापकांना दिला पाहिजे. त्यामुळे त्यांना काय साहित्य, माल दर्जा याची माहिती होते. याबाबत शासनाकडे सुचना केली जाणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)