शाळाखोल्यांच्या बांधकामाला मुहूर्त कधी सापडणार

शाळा निर्लेखन प्रस्तावांना विलंब; दहा कोटीचा निधी धूळखात पडून 

दक्षिणेतील सर्वाधिक शाळा

मोडकळीस व धोकादायक शाळा नगर दक्षिण भागात आहे. 501 शाळांच्या 1 हजार 724 खोल्या निर्लेखन करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. परंतू या भागातील शाळांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव येण्यास विलंब होत आहे. या भागातील लोकप्रतिनिधींकडून हे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत प्रयत्न होत नाही. तसेच शिक्षण व बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव असल्याने शाळाखोल्यांचे निर्लेखन रखडले असून परिणामी निधी असूनही बांधकाम ठप्प झाले आहे.

नगर – एवढा आटापिटा करून शिर्डी साईबाबा संस्थानकडून जिल्ह्यातील शाळा खोल्या उभारणीसाठी 30 कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी 10 कोटीचा निधी देखील उपलब्ध झाला आहे. परंतू शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचा प्रस्तावांना विलंब होत असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून 10 कोटीचा निधी धूळखात पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 106 शाळांचा 305 खोल्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. शाळांची निवड संस्थानने केल्या 140 शाळांचे बांधकाम मार्गी लागेल.

नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा कोसळल्याने तीन विद्यार्थ्यांचा अंत झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांचा विषय ऐरणीवर आला होता. जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात श्रीगोंदा, पाथर्डी येथील शाळा कोसळल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात तब्बल 882 शाळांच्या 2879 खोल्या निर्लेखन करण्याचे चित्र समोर आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर शाळा उभारणीसाठी राज्य शासनाने निधी द्यावा म्हणून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. परंतू एवढा मोठा निधी देणे शासनाला शक्‍य नसल्याने अखेर शिर्डी साईबाबा संस्थानकडे शाळा खोल्या नव्याने उभारणीचे साकडे घालण्यात आले. मोडकळीस आलेल्या तब्बल तेराशे शाळा खोल्या तातडीने उभाराव्या लागणार असल्याचे आढळून आले. एवढी भीषण स्थिती शाळांची झाली असून सध्या या शाळाखोल्यांमधील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

शिर्डी संस्थानने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नव्याने शाळा खोल्या उभारणीसाठी 30 कोटी निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 10 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. या 10 कोटींच्या निधीतून अंदाजे 140 नवीन शाळा खोल्या होऊ शकतील. राज्य शासनाच्या मान्यतेअभावी हा प्रस्ताव अडगळीत पडला होता.

त्यानंतर जुलै महिन्याच्या 26 तारखेला शासनाने 10 कोटींच्या निधीला मंजुरी दिली. या निधीतून बांधकाम करावयाच्या जिल्हा परिषद शाळा निवडण्याचे अधिकार शासनाने शिर्डी संस्थानला दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गेलेल्या शाळांच्या यादीतून बांधकामासाठी शाळा निवडायच्या आहेत. परंतू ही निवड रखडली आहे.

दरम्यान शाळा खोल्याचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव देखील बांधकामाला अडसर ठरत आहे. जिल्हा परिषदेने दक्षिणेतील 501 शाळांच्या 1 हजार 724 खोल्या तर उत्तरेतील 381 शाळांच्या 1 हजार 155 खोल्या निर्लेखन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत 243 शाळांचे 673 खोल्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

तसेच 146 शाळांचे 500 खोल्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्या परत पाठविण्यात आले आहेत. तर 106 शाळांचे 305 खोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले असून त्यापैकी केवळ 4 शाळांचे 11 खोल्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहे.

निर्लेखन न झाल्याने नव्याने शाळाखोल्या उभारणी कशी करणार असा प्रश्‍न आहे. जुन्या शाळा पाडल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने शाळा उभारण्यात येतील. संबंधित शाळांकडून निर्लेखनाचे प्रस्ताव येण्यास विलंब होत आहे. परिणामी शाळा खोल्यांचे बांधकाम रखडले आहे. संस्थानकडून 10 कोटींचा निधी उपलब्ध होवून आज तीन महिने झाले तरी बांधकामचा विषयावर कोणीच बोलायला तयार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)