जिल्ह्यात पाणीयोजना अन् हातपंपांनी टाकली मान

ऑक्‍टोबर महिन्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण सुरू

नगर – यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आता बंद पडू लागले आहेत. पाणीयोजनांच्या उद्‌भवाचे पाणी कमी झाल्याने जिल्ह्यात तब्बल 112 स्वतंत्र पाणीयोजना तसेच 1 हजार 118 हातपंपांनी मान टाकली आहे. पाणीयोजना व हातपंप पूर्णपणे बंद पडल्याने ग्रामीण भागात ऑक्‍टोबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून या गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 69 टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. बहुतांशी तालुक्‍यात 50 टक्‍केच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आतापासून भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा पहिला फटका पाणीयोजना व हातपंपांना बसला आहे. जिल्ह्यात 1 हजार 417 स्वतंत्र पाणीयोजना असून त्यापैकी सध्या 112 पाणीयोजना बंद झाल्या आहेत. उद्‌भवातील पाणी कमी झाल्याने या योजना बंद झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यात 8 हजार 896 हातपंप असून त्यापैकी 1 हजार 118 हातपंप बंद पडले आहेत. पाणीयोजना बंद होण्यात सर्वाधिक पारनेर व पाथर्डी तालुक्‍याचा समावेश आहे.

स्वतंत्र पाणीयोजना बहुतांशी गावातील विहिरी तसेच प्रकल्पांवर अवलंबून आहेत. विहिरीचे पाणी कमी झाल्याने तसेच प्रकल्प कोरडे पडल्याने आज या पाणीयोजना बंद पडल्या आहेत. या पाणीयोजनांच्या माध्यमातून गावांना थेट नळाद्वारे पाणी उपलब्ध होत होते. परंतू आज या योजना बंद पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही योजना हातपंपावर आहेत. तेथेही ती परिस्थिती आहे.

सध्या प्रशासनाकडून 90 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने तयार केलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यात 678 टॅंकरचे नियोजन केले आहे. परंतू सध्या स्थिती पाहता पुढील दोन ते तीन महिन्यात टॅंकरची संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्‍यता आहे.

तालुकानिहाय बंद पडलेल्या पाणीयोजना पुढील प्रमाणे : अकोले 7, संगमनेर 11, शेवगाव 7, पाथर्डी 21, नगर 2, पारनेर 28, श्रीगोंदा 7, कर्जत 18, जामखेड 11.

तालुकानिहाय बंद पडलेले हातपंप : अकोले 9, संगमनेर 69, कोपरगाव 27, श्रीरामपूर 62, राहुरी 34, नेवासे 76, राहाता 27, शेवगाव 107, पाथर्डी 143, जामखेड 33, कर्जत 243, श्रीगोंदा 87, पारनेर 87, नगर 114.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)