नगर अर्बनकडून आरबीाआयचे निर्देश धाब्यावर

सुवालाल गुंदेचा – जेलवारी केलेल्या व्यावसायिकाला 36 कोटींचे कर्ज.

नगर – एका व्यक्तीला किती कर्ज द्यावे, याबाबत रिझर्व्ह बॅंकेने नगर अर्बन बॅंकेला काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश धाब्यावर बसवून, अर्बन बॅंक बांधकाम क्षेत्रातील एका जेलवारी करून आलेल्या व्यावसायिकाला 36 कोटी रुपयांचे कर्ज द्यायला निघाली आहे, असा सणसणाटी आरोप बॅंकेचे 47 वर्षे संचालक व बारा वर्षे अध्यक्ष राहिलेल्या सुवालाल गुंदेचा यांनी पत्रकार परिषदेत केला.

गुंदेचा गेल्या बऱ्याच महिन्यांपासून अंथरुणाला खिळून आहेत. तरीही त्यांनी आज संध्याकाळी पत्रकारांना एक निवेदन दिले. त्यात त्यांनी खा. दिलीप गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चालू असलेल्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्बन बॅंक वाचविण्यासाठी माजी अध्यक्ष ऍड. अशोक कोठारी, दीप चव्हाण, राजेंद्र गांधी यांना बोलावून घेऊन त्यांच्यांशी चर्चा केली. त्यानंतर सुवालाल यांचे चिरंजीव मनोज व या तिघांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगर अर्बन बॅंकेत पूर्वी कधीही नोकरभरतीसाठी तसेच कर्जासाठी पैसे घेतले जात नव्हते; परंतु आता टक्केवारी घेऊन कर्ज मंजूर केले जाते.

बॅंकेत ठेकेदार संचालक झाले आहेत. संचालक मंडळाच्या गेल्या दोन बैठकांत सोलापूरच्या एका कर्जाचे प्रकरण समोर आले. त्याला दहा संचालकांनी विरोध केला. तुरुंगात राहून आलेल्या आणि वादग्रस्त गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या एकाच व्यक्तीला सुमारे 36 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचा विषय संचालक मंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीपुढे ठेवला आहे. त्याबाबत त्यांनी नकार द्यावाच, मग आम्ही तपशील जाहीर करू, असे आव्हान त्यांनी दिले.

ऍड. कोठारी, गुंदेचा, गांधी म्हणाले, की नगर अर्बन बॅंक मल्टीस्टेट होऊनही तिला अन्य राज्यांत शाखा उघडायला रिझर्व्ह बॅंक परवानगी देत नाही. 166 कोटी रुपयांचे अनुत्पादक मालमत्तेचे कर्ज आहे. ते बुडीत निघाल्यात जमा आहे. एनपीए 19 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्याने लाभांश देण्यावरही निर्बंध आहेत. अन्य बॅंकांचे विलीनीकरण करायलाही परवानगी नाही. तरीही खा. गांधी दिशाभूल करीत आहेत.

बांधकाम व्यवसायापुढील समस्या लक्षात घेतल्या, तर मोठे कर्ज देऊ नये, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या आहेत, तरीही या सूचना धाब्यावर बसवून नगर अर्बन बॅंक बांधकाम व्यावयसियकाला कर्ज देत आहे. नगर अर्बन बॅंकेची निवडणूक पुढच्या वर्षी असून निवडणूक म्हणून आम्ही हे आरोप करीत नाहीत, तर बॅंक वाचविण्यासाठी सभासद, कर्जदार व कर्मचाऱ्यांना साकडे घालीत आहोत.

खा. गांधींना क्‍लिन चीट नाही

यापूर्वी खा. गांधी यांच्याविरोधात सहकार खाते, रिझर्व्ह बॅंक तसेच न्यायालयात दावे दाखल केले. त्यात त्यांना क्‍लिन चीट मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते, त्याकडे लक्ष वेधता माजी पदाधिकाऱ्यांनी खा. गांधी यांना कुठेही क्‍लिन चीट मिळालेली नाही. त्यांच्याविरोधातील दावे अजूनही चालू आहेत, असे सांगितले.

पत्रकार परिषद न घेण्यासाठी दबाव

गुंदेचा पत्रकार परिषद घेणार असे कळल्यानंतर काही संचालकांनी तिथे धाव घेतली. पत्रकार आले असतानाही बॅंकेच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होईल, पत्रकार परिषद घेऊ नका, असे गुंदेचा यांना सांगत होते. त्यासाठी दबाव आणला जात होता; परंतु अगोदरच उशीर झाला आहे, आता आवाज उठविला नाही, तर बॅंक रसातळाला जाईल, असे सांगून पत्रकारांशी संवाद साधण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)