शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा

जिल्हाधिकाऱ्यांची मोहिम केवळ नावालाच

नगर – शहरातील अरुंद रस्ते, वाहन पार्किंगचा अभाव, फूटपाथवर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षा चालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे नगरमध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. सातत्याने कुठे-ना-कुठे लहान-मोठे अपघात होतच आहेत. शाळकरी मुले व पादचाऱ्यांना तर जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे.

-Ads-

गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पण रस्त्यांची लांबी-रुंदी वाढलेली नाही. वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरु असतात, पण त्यांना महापालिका प्रशासनाची कोणतीही मदत मिळत नाही. परिणामी वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मध्यतंरी शहरातील प्रमुख मार्गांसह बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेवून गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. परंतू आज सर्व अतिक्रमणे जैसे थेच दिसत आहे.

द्विवेदी यांनी नावालाच की स्वतःचा दबदबा वाढविण्यासाठी ही मोहिम राबविली हे कळत नाही. शहरातून जाणाऱ्या प्रमुख राज्यमार्गावरील अतिक्रमणे हटविली असली तरी आज ही मोहिम राबविली होती की नाही असाच प्रश्‍न पडतो. शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या सध्या नगरकरांना भेडसावत आहे. दहा वर्षापूर्वी एकेरी मार्ग काही रस्ते करण्यात आले होते. पण आज ते अस्तित्वात नाही. सणासुदीला बाजारपेठेत मोठी गर्दी होते. पण यावेळी वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे नगरकरांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

शहरात पार्किंगसाठी 21 जागा निश्‍चित केल्या आहेत. परंतू आज एकही जागा महापालिकेच्या ताब्यात नाही. एक-दोन जागांवर पार्किंग होत आहे. तेथेही खासगी व्यक्‍तीकडून पार्किंगचे पैसे घेण्यात येत आहे. अर्थात काही नगरसेवकांच्या समर्थकांनी या पार्किंगचा ताबा घेतला आहे. आजही बहुतांशी ठिकाणी रस्त्यावरच भाजीबाजार भरतो. चितळे रस्ता, गाडगीळ पटांगण, माळीवाडा, भिस्तबाग, केडगाव, नागापूर या ठिकाणी रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. छत्रपती मार्केट हे भाजीपाला विक्रीसाठी उभारण्यात आले. परंतू ज्या विकासकाने हे मार्केट उभारले. त्याने सर्व ताबा घेवून अन्य व्यावसायिकांना जागा दिल्या आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे ते रस्त्यावर बसत आहे.

रिंगरोड बासनात

नगर शहरातून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. त्यांना वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. परंतू बाह्यवळण रस्त्याची दुरवस्ता असल्याने अवजड वाहने या रस्त्याऐवजी शहरातून जाणे पसंत करीत आहे. त्यामुळे नगर-पुणे, नगर-मनमाड या दोन्ही रस्त्यावर वाहतूकीची नित्याची झाली आहे. सध्या या बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. ते कधी पूर्ण होणार हे बांधकाम खात्याला माहिती. अवजड वाहने शहरतून जा-ये करीत असल्याने तासन्‌ तास वाहतूक कोंडी होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून त्याचा फायदा पोलीस कर्मचारी घेत आहेत.

या प्रमुख मार्गांवर होतेय कोंडी…

नगर-पुणे, नगर मनमाड, दिल्लीदरवाजा, न्यु आर्टस्‌ महाविद्यालय, पत्रकार चौक, झोपडी कॅन्टींग, प्रेमदान चौक, स्टेट बॅंक चौक, चांदणी चौक, बाजार समिती चौक, इम्परियल चौक, स्वस्तिक चौक, सक्‍कर चौक, अमरधाम चौक, या भागात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सकाळी दहा ते बारा व सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत प्रामुख्याने वाहतुकीची कोंडी होते. पादचाऱ्यांना रस्ताही ओलांडता येत नाही. चौकात उभे असलेले पोलीस देखील वैतागून बाजूला होतात. अनेकदा बेशिस्त वाहनचालकांमुळे त्यांच्या नियोजनावर पाणी पडते. त्याचा परिणाम वाहतूक कोंडी वाढण्यावर होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू असला तरी, त्यात अद्याप यश आलेले नाही. कठोर पावले उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अन्यथा वाहतूक कोंडीचा प्रश्न भविष्यात आणखी गंभीर होऊ शकतो.

ठराविक वेळेत गर्दी

सकाळी दहानंतर शहरातील वाहतूक वाढते. अकरा ते बारा व सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. शाळकरी मुलांची शाळेला जाण्याची लगबग असते. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनेही याच वेळेत धावतात. याशिवाय नोकरदार मंडळी, ग्रामीण भागातून फळे-भाजीपाला विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांची गर्दी होते.

फेरीवाल्यांचा बेशिस्तपणा…

बहुतांश रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसते. विशेषत: सायंकाळी सहानंतर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांचे हातगाडे लागलेले असतात. फूटपाथही फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. महापालिका प्रशासन फेरीवाल्यांवर कारवाईचे धाडस दाखवित नसल्याने त्यांचा बेशिस्तपणा वाढला आहे. त्यात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी रखडली आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांची स्पर्धा

शहरातील रिक्षा सुसाट सुरु आहे. ठरवून दिलेल्या थांब्याशिवाय ते कुठेही वाहन थांबवून प्रवासी घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सध्या शहरात साडेतीन हजाराहून अधिक रिक्षाचालक आहेत. अधिकृत रिक्षा थांबे वाढविण्याची गरज आहे. डिझेल रिक्षा चालक तर बसस्थानक, दिल्ली दरवाजा, न्यु आर्टस्‌ महाविद्यालय, लालटाकी, सिव्हील हॉस्पीटल, पत्रकार चौक, ते औद्योगिक वसाहत तसेच केडगाव, भिंगार या मार्गावर कुठेही वाहने थांबवून प्रवासी घेतात. यासाठी त्यांची स्पर्धा लागलेली असते. त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी होत असूनही कार्यवाही होत नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)