संग्रहित फोटो

शासनाचा 1 एप्रिलच्या निर्णयाची अंमलबजावणी : अनुदानप्राप्त शाळंना अटी व शर्तींची पूतर्ता करावी लागणार

नगर  – राज्यात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या आठ हजार 419 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने 20 टक़्के अनुदान देण्याचे मान्य करत शिक्षकांना दिलासा दिला आहे. 738 शाळा व दोन हजार 55 तुकड्यांना 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बिनपगारी असलेल्या शिक्षकांना शासनाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

शासनाने नऊ मे रोजी एक-दोन जुलैला अनुदानास पात्र असलेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला होता. मात्र, तरीही या बिनपगारी शिक्षकांना पगार देण्याबाबतचा शासन निर्णय निघत नव्हता. महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेने हा निर्णय निघावा, यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने या शिक्षकांना 1 एप्रिल 2018 पासून 20 टक्के अनुदान मंजूर केले आहे. अनुदानप्राप्त शाळांनी 19 सप्टेंबर 2016 मधील अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक असल्याचेही या शासनादेशात म्हटल्याची माहिती शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिली.

गेल्या 15 वर्षापासून हा प्रश्‍न प्रलंबित होता. शासनाने 20 टक्के अनुदान मंजूर केल्याने या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. या शिक्षकांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी शिक्षक भारती संघटना यापुढे अधिक आक्रमक भूमिका घेणार आहे.
-सुनील गाडगे, शिक्षक नेते

महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे शिक्षक नेते सुनिल गाडगे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महानगरचे जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, महिला कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी आदींनी मंत्रालयात शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन गुरुवारी चर्चा केली. बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्‍न मार्गी लावण्याची चर्चा करत त्यातून मार्ग काढण्याची मागणी केली. शिक्षण मंत्री यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत त्यासाठी 20 टक्के अनुदान मंजूर केले आहे.

आकडे बोलतात

अनुदान मंजूर झालेल्या शाळांची स्थिती -प्राथमिक शाळा-158 , प्राथमिक शाळांच्या तुकड्या-504, या दोन्ही शाळांवरील शिक्षक-1417, माध्यमिक शाळा-580, माध्यमिक शाळांच्या तुकड्या-1551, या दोन्ही शाळांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी-7002, एकूण-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी – 8419

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)