जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध

औद्योगिक वसाहतीसाठी जमीन अधिग्रहणाबाबत जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, नाशिक औद्योगिक विकास मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी पळवे बुद्रुक व बाबुर्डी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

पाटील : पळवे, बाबुर्डी शेतकऱ्यांशी संवाद, शेतकरी संघटना तीव्र स्वरुपाचा लढा उभारणार

सुपे – पारनेर तालुक्‍यातील सुपे औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रासाठी पळवे बु. आणि बाबुर्डी येथील जमिनीची सन 2016 साली अधिग्रहण प्रक्रिया सुरु झाली. या दरम्यान काही शेतकऱ्यांनी यास विरोध दर्शविला. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे शेतकरी कल्याणकारी संस्थेतर्फे निवेदन दिले. विस्तारित वसाहतीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जमीनी द्याव्यात मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे दबाव राहणार नसल्याचे प्रतिपादन नाशिक औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी केले.

-Ads-

बुधवारी (दि.3) रोजी पळवे बु. व बाबुर्डी ता. पारनेर येथील शेतकऱ्यांशी पाटील यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तहसीलदार गणेश मरकड, स्थानिक औद्योगिक वसाहतीचे गायकवाड, माजी महापौर अभिजीत कळमकर, सरपंच वनिता सातपुते, उपसरपंच बाळासाहेब कळमकर आदी उपस्थित होते.

पुढे पाटील म्हणाल्या, औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्यानंतर, त्यामध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल. दिलेल्या जमिनीपैकी 15 टक्‍के प्लॉट डेव्हलप करुन देणार आहोत. जमिनीची किती रक्कम द्यायची हे जिल्हाधिकारी ठरवतील.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, शासनाचा हा प्रकल्प महत्वकांक्षी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भावनांची भरपाई कितीही पैसे दिले तरी, होणार नाही. कारण तो स्वावलंबी आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीनेच अधिग्रहण केले जाईल असे द्विवेदी यांनी सांगितले.

यावेळी अहमदनगर महानगरपालिकेचे माजी महापौर अभिजीत कळमकर यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना प्राधांन्य मिळावे अशी मागणी केली. शेतकरी गोरक्ष कळमकर यांच्यासह शेतकऱ्यांनी आपले म्हणणे यावेळी मांडले.
शेतकरी कल्याणकारी संस्थेचे मार्गदर्शक ज्ञानदेव जगताप यांच्यातर्फे पळवे, बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध असलेले 88 शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांना दिले.

बागायती जमिनी वगळून जिरायतीचे अधिग्रहण करावे. अधिग्रहणामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. कृषिप्रदान समजल्या जाणाऱ्या देशात व राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय न करता त्यातून मार्ग काढावा. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी संघटना तीव्र स्वरुपाचा लढा उभारणार आहे. यापुढेदेखील आम्ही बागायती जमीन अधिग्रहणास विरोधच करु, असे शेतकरी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय ठुबे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष पंढरीनाथ सोनवने, खजिनदार राजेंद्र कळमकर, सचिव दादाभाऊ दिवटे यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार तहसीलदार गणेश मरकड यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)