झाडांच्या संगोपनातून केली दिवाळीची सुट्टी साजरी

झाडांच्या संगोपनासाठी अधिकारी सरसावले

सुपे – पारनेर तालुक्‍यातील लोणी हवेली येथील अनेक लोक नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. दिपावलीची सुट्टी असल्यामुळे ही सर्व मंडळी गावी सुट्टीवर आली आहेत. गावी आल्यानंतर यंदा दुष्काळ असल्यामुळे आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार मनात येऊन लावलेल्या झाडांच्या संगोपनासाठी अधिकारी सरसावले.

नुकतेच लोणी हवेली ते जामगाव घाटमाथा अशा रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्षांची लागवड केली आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई यामुळे शेतातील पिके करपली आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी डोंगर माळरानावर असणारे गवत करपले आहे. मग ही झाडे कशी जगणार ? झाडे जगली पाहिजेत, असा विचार या सर्व मंडळींच्या मनात आला आणि आपण ही झाडे जगवू त्यांना पाणी घालू आणि लगेच गावातील ग्रामस्थ व ही सुट्टीवरील मंडळी यांनी झाडांना पाणी देण्याचा निर्णय घेतला.

गावातील 50 ते 60 ग्रामस्थ व सध्या दिपावलीच्या सुट्टीवरील अधिकारी मंडळी यांनी रोज सकाळी 6.30 वाजता एकत्र येत, प्रत्येकाने घरातून एक पाण्याची बाटली आणून जवळ-जवळ दोन हजार झाडांना पाणी देण्याचा नित्य उपक्रम 4-5 दिवसांपासून सुरु केला आहे. ही सर्व मंडळी रोज दोन तास आपला वेळ देऊन वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. यापुढेही महिन्यातून एका सुट्टीच्या दिवशी एकदा झाडांना पाणी घालून मजुरांना मदत करण्याचा संकल्प केला.

पर्यावरणाला तडा जाईल असे वागू नका, झाडे कापून आपल्यालाच स्वत:ची लाज वाटेल असे काही करू नका, पर्यावरणाची हानी करून संकटाना आमंत्रन देऊ नका, पर्यावरणाची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे, हे कधीच विसरू नका, ज्यामुळे ओसाड जमीण पुन्हा हिरवीगार करायला आपल्या सभोवताली झाडे लावायला विसरू नका, झाडे लावा, झाडे जगवा, मैञी करायची असेल तर निसर्गाशी करा हा संदेश लोणीकरांना दिला.

या उपक्रमामध्ये मंत्रालय सहसंचालक अरूण कोल्हे, नाशिकचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, पुण्याचे एपीआय शशिकांत जगताप, बाळासाहेब जाधव, शिवाजी थोरे, प्रा. संजय कोल्हे, सुनील दुधाडे, उत्तम बाबुजी, प्रा. संदीप गाडेकर, शत्रुघ्न नवघणे, दत्तू थोरे, विजय थोरे, शरद घोगरे आदी सहभागी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)