व्यावसायिकाने घेतल्या स्वत:वर गोळ्या झाडून

चांदबीबी महालाजवळचा प्रकार; कर्जबाजारीपणातून केलेले कृत्य

नगर – नगरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अभिजीत सावंत (वय 47) यांनी आज सायंकाळी चांदबीबी महालानजीक (ता. नगर) येथे जाऊन स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. सावंत हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंत यांनी कर्जबाजारीपणातून हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे येत आहे. नगर तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

सावंत काही दिवसांपासून अस्वस्थ होते. आज त्यांनी स्वतःकडील पिस्तूल घेऊन चांदबीबी महाल गाठले. तिथे त्यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराच्या आवाजाने चांदबीबी महालावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी धाव घेतली. त्या वेळी त्यांना सावंत हे रक्ताच्या थोराळ्यात पडलेले दिसले. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्यांशी संपर्क साधून पोलिसांनी झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सावंत यांना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सावंत यांच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जीवनवाहिनीकेचा आधार दिला होता.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन घटनेची माहिती घेतली. जयंत मीना म्हणाले, की सावंत यांनी स्वतः कडील पिस्तुलातून गोळ्या झाडून घेतल्या आहेत. घटनास्थळी पिस्तूल सापडले असून, काडतुसाच्या रिकाम्या दोन पुंगळ्या सापडल्या आहेत. सावंत यांनी हा प्रकार कर्जबाजारीपणातून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल ताब्यात घेतले आहे. त्या पिस्तुलाच्या परवान्याची माहिती घेतली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)