प्रशासनाकडून ‘स्थायी’ला शून्य किंमत

ठराव करूनही गांधी मैदानातील मनपा शाळेची इमारत प्रगत विद्यालयास

नगर – महापालिका स्थायी समितीला प्रशासनाकडून शुन्य किमत देत असल्याचे सत्य उघड झाले आहे. स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे यांच्यासह सदस्यांनी ऐनवेळी “तसेच’ने घुसडविलेले विषय 451 कलमाने विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवून ते रद्द करावेत तसेच त्याची चौकशी करण्याचा ठराव केला असतांनाही त्याला न जुमानता महापालिका प्रशासनाने ते विषय मंजुर केले. त्यामुळे महापालिकेतील स्थायी समितीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ठराव होवून देखील महापालिकेच्या गांधी मैदानातील शाळा क्रमांक एकची इमारत भाडेकराराने दि. प्रोग्रोसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत विद्यालयाला देण्यात आली.

महापालिकेच्या दि. 16 जुलै रोजी झालेल्या स्थायीच्या बैठकीत मागील इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी नगरसचिवांना चांगलेच अडचणीत आणले होते. दि. 29 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विषयपत्रिकेत विषय नसतांना इतिवृत्तामध्ये अनेक विषय घुसडविण्यात आले आहे. त्याचे काय करणार असा सवाल बोराटे यांनी नगरसचिवांना केला होता. “तसेच’ ने हे विषय घेण्यात आलेले विषय विषयपत्रिकात न घेता परस्पर इतिवृत्तामध्ये घुसडविण्यात आले असतील तर ते विखंडीत करण्यात येतील असे नगरसचिवांनी स्पष्ट केले.

त्याबाबत चौकशी करण्यात येणार असून शासनाकडे ते विषय पाठविण्यात येणार असल्याचे नगरसचिवांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी बोराटे यांच्यासह अनेक सदस्य व सभापती वाकळे आक्रमक झाले. अशा पद्धतीने विषय घुसडविण्यात आले असतील. तर त्या विषयाला मंजूरी देण्यासाठी सुचक व अनुमोदक असणाऱ्या सदस्यांवर कारवाई होणार असल्याचेही नगरसचिवांनी स्पष्ट केले. तसेच असे विषय शासनाकडे पाठविले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे नगरसचिवांनी स्पष्ट केले. परंतू सभापती व सदस्य या विषयावरून प्रशासना चांगले धारेवर धरले होते. त्यानंतर अखेर सभापती वाकळे यांनी तसेच ने घुसडविलेले विषय रद्द करून त्याची चौकशी करावी तसेच ते विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवावेत असा ठराव करण्याचे आदेश दिले.

सभेत तसाच ठराव देखील झाला होता. असे असतांना महिन्याभराने मात्र प्रशासनाने स्थायी समितीच्या सभापतीसह सदस्यांना शुन्य किमत देवून घुसडविलेले विषय मंजुर करून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अस्तित्व आता नावालाच उरले असल्याचे दिसत आहे. सभापतींसह सदस्यांचा धाकच राहिला नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी आपल्या मनाप्रमाणेच कामकाज करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतेच मार्केट विभागाचे प्रमुख कैलास भोसले यांनी या इमारतीचा ताबा दि. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दि. ना. जोशी यांच्याकडे दिला आहे.

संबंधितांवर कारवाई करणार- वाकळे

स्थायी समितीमध्ये ठराव करण्यात आला असून ते घुसडविलेले विषय रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतू अधिकाऱ्यांनी स्थायीचा आदेश न जुमानता विषय मंजुर करून अंमलबजावणी केली असेल तर त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे. ते विषय रद्द करून पुन्हा महापालिका शाळेची इमारत महापालिका ताब्यात घेणार असल्याचे मत स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलतांना व्यक्‍त केले. ते म्हणाले की, केवळ प्रतिक्रिया देण्यासाठी कारवाईची भाषा करत नाही तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी देखील करणार असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)