सोनई दलितवस्तीत पायाभूत सुविधांचा अभाव

युवक राष्ट्रवादीतर्फे आंदोलनाचा इशारा; दलित वस्ती विकास निधीच्या चौकशीची मागणी

सोनई – कोट्यावधी रुपयांचा प्रत्यक्ष निधी मिळूनही त्याचा बेकायदेशीरपणे इतरत्र खर्च केला जात असल्याने सोनई येथील दलित वस्तीला बकाल अवस्था आल्याचा आरोप करत, कामे मार्गी लावण्याच्या मागणीसाठी उपोषण व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा युवक राष्ट्रवादीचे नेवासे तालुका सरचिटणीस सनी साळवे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

नेवासे पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात साळवे यांनी म्हटले आहे की, मागासवर्गीय समाजाचे जीवनमान उंचावून त्यांना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी शासन दलित वस्ती सुधार निधीच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असते. ग्रामपंचायत स्तरावर मिळणाऱ्या या निधीचा विनियोग दलित वस्तीत पायाभूत सुविधांची निर्मिती करुन वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेला हा मोठा समाजघटक मुख्य प्रवाहात यावा, यासाठी या निधीचा इतर प्रयोजनासाठी खर्च करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

मात्र सोनई ग्रामपंचायतीचा कारभार याला अपवाद ठरल्याचे त्यांनी नमूद केले. या ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर न केल्यामुळे गेल्या काही वर्षांत सोनईतील दलित वस्तीत राहणाऱ्या रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भ्रष्ट कारभारामुळे जी काही रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे झालीत, ती निकृष्ट दर्जाची झाल्याने अल्पावधीतच निरुपयोगी ठरु लागल्याकडे त्यांनी या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे, स्मशानभूमीला संरक्षक भींत घालणे, स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे, पथदिव्यांची सोय करणे, सार्वजनिक शौचालयाच्या सांडपाण्याचा निचरा करणे अशा मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाला यापूर्वी अनेकदा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. दलित वस्ती सुधार निधीची माहिती माहिती अधिकारात मागितली असता ती, देण्यासही संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची, तक्रार साळवे यांनी केली आहे.

सोनई ग्रामपंचायत प्रशासनाच्या या मनमानीला कंटाळूनच अखेर न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या दि. 16 डिसेंबर ला दलित वस्तीतील ग्रामस्थांसह नेवासे पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा साळवे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)