छिंदमच्या अपात्रेबाबत 17 तारखेला सुनावणी

नगरविकास राज्यमंत्री घेणार निर्णय

नगर – शिवद्रोही श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री यांच्या दलनात बुधवारी (ता. 17) सुनावणी होणार आहे. नगर विकास खात्याचे कक्ष अधिकारी सु. द. धांडे यांनी महापालिका आयुक्तांना तसे हजर राहण्याचे पत्र दिले आहे. या सुनावणीकडे नगरकरांसह राज्याचे लक्ष लागले आहे.

-Ads-

श्रीपाद छिंदम हा उपमहापौर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्याला भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना हे विधान केले होते. हे विधान समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यावरून राज्यसह देशात पडसाद उमटले.

नगरमध्ये या विधानावरून संतापजनक वातावरण होते. श्रीपाद छिंदम याची यानंतर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी पक्षातून हकालपट्टी केली होती. उपमहापौर पदाचा राजीनामा देखील घेण्यात आला होता. श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी सामाजिक संघटनांपासून राजकीय पक्षांनी केली होती.

राजकीय व सामाजिक संघटनांचा दबावामुळे महापौर सुरेखा कदम यांनी त्याची दखल घेत 26 फेब्रुवारीला विशेष महासभा बोलावली होती. या सभेत श्रीपाद छिंदम याच्या विधानाचा सर्वच पक्षीय नगसेवकांनी निषेध केला. भारतीय जनता पक्षाने त्याच्या नगरसेवक पदाचा राजीनामा सादर करू, असेही सांगितले होते. परंतु त्यावर पक्षाकडून कोणतेही कार्यवाही झाली नाही. या महासभेत विशेष ठराव करून छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला.

नगरविकास विभागाकडे हा ठराव पाठवून त्यावर कार्यवाही करण्याची विनंती महापौर सुरेखा कदम यांनी केली होती. नगरविकास खात्याचे राज्यमंत्री यांनी या ठरावाच्या प्रस्तावाची दखल घेतली असून, त्यावर बुधवारी (ता. 17) सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीची टिपणी सोमवारपर्यंत (ता. 15) मागविण्यात आली आहे. यानुसार महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या नगर विकास विभागाचे अधिकारी यांना बोलावून घेत प्रस्तावाची माहिती घेतली.

या सुनावणीच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेत द्विवेदी यांनी सोमवारी पाठवून देण्यासाठी संक्षिप्त टिपणीची तयारी केली आहे. मंत्रालयात बुधवारी होणाऱ्या सुनावणीला आयुक्त काय भूमिका मांडतात आणि नगर विकास राज्यमंत्री यावर काय निर्णय घेतात याकडे नगरकरांसह राज्यातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)