अजनूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिक्षणाची जबाबदारी घेतली परिक्रमाने
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कपिल गुंड यांच्या दोन्ही मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी परिक्रमा शैक्षणिक संकूल घेणार असल्याचे सांगितले.
श्रीगोंदे – तालुक्यातील अजनूज येथील रहिवासी असलेले कपिल नामदेव गुंड (वय-24 वर्षे) हे जम्मू काश्मीरमधील उडी सेक्टर कालापहाड ठिकाणी लष्करी सेवेत कर्तव्यावर असताना, गुरूवारी (दि 15) रात्री झालेल्या बॉम्ब स्फोटात त्यांना वीरमरण आले.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अजनूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भीमातीरी कपिल गुंड यांस शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
कपिल गुंड हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत वरील नमूद ठिकाणी कर्तव्यावर असताना, रात्रीच्या वेळी अचानक मोठा स्फोट झाला. त्यात कपिल व त्यांचा सहकारी हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उधमपूर येथील लष्करी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र कपिलला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कपिलचा मृतदेह उधमपूर येथून विमानाने पुण्याला आणण्यात आले. पुढे पुण्यातून लष्करी वाहनातून अजनूज त्यांच्या घरी आणण्यात आले.
फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून अतिशय शोकाकूल वातावरणात गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. भीमा नदीतीरी कपीलवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या पेटीत कपिलचे पार्थिव ठेवण्यात आले होते, त्यावरील भारताचा राष्ट्रध्वज वडील नामदेव गुंड यांना मुलाच्या विरत्वाचे आणि सर्वोच्य बलिदानाचे प्रतीक म्हणून उपस्थित जवानाच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहूल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, बाळासाहेब महाडिक, माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, सुवर्णा पाचपुते, तहसीलदार महेंद्र माळी, प्रभारी पोलीस निरीक्षक करनोर, हरिदास शिर्के यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शहीद कपिल गुंडचे वडील नामदेव गुंड यांनी पार्थिव देहाला अग्नीडाग दिला. शहीद जवान कपिल गुंड यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा