‘लक्ष्मीपूत्र’ अन्‌ ‘ज्येष्ठ नेत्यां’च्या प्रभागात आवाज कोणाचा?

लक्ष्मीनगर प्रभाग क्र.2 : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक रणसंग्राम


अर्शद आ. शेख

हे आहेत लक्ष्मीनगर प्रभागातून इच्छुक

भाजपकडून गणेश भोस, सुनीता खेतमाळीस, संतोष खेतमाळीस तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडून धनंजय दांडेकर, समीर बोरा, सुदाम दांडेकर, प्रशांत दरेकर, भानुदास राऊत, साहेबराव बनकर, महेंद्र आळेकर, दादा निंभोरे, सागर वांगणे आदी इच्छुक आहेत. शिवसेनेकडून संजय आनंदकर, बाळासाहेब शेलार, बाळासाहेब दूतारे, विद्या आनंदकर व नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले मीनल भिंताडे या पर्याय म्हणून या प्रभागाकडे पाहत आहे.

श्रीगोंदे – श्रीगोंदा शहरातील उपनगर व वाडी-वस्तीशी संलग्न असलेला लक्ष्मीनगर प्रभाग राजकीय दृष्ट्‌या महत्वाचा आहे. या प्रभागात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्‍याम शेलार यांचे वास्तव्य आहे. या प्रभागात इच्छुकांची संख्या उदंड आहे. या प्रभागातील नागरिक कोणाच्या हाकेला ओ देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

लक्ष्मीनगर प्रभागातून 2009 मध्ये पाचपुते समर्थक असलेले ठेकेदार मधुकर दोबोले यांचा कॉंग्रेसनिष्ठ समीर बोरा यांनी 135 मतांनी पराभव केला होता. तर गणपती मंदिर परिसरातून सुनीता संतोष खेतमाळीस यांनी कुसुम धनाजी दांडेकर यांना 12 मतांनी पराभवाची धूळ चारली होती. परिणामी 2014 ला झालेल्या निवडणुकीत दांडेकर मळा व आळेकर मळा परिसरात भावनिक राजकारण झाले. कॉंग्रेसच्या कुसुम दांडेकर यांना मतदारांनी 727 मतांची आघाडी देत विजयी कौल दिला. तर माजी नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस (पाचपुते गट) यांना कॉंग्रेसच्या वैशाली अशोक आळेकर यांच्याकडून पराभूत व्हावे लागले.

प्रभागाची व्याप्ती

लक्ष्मीनगर प्रभाग क्र. 2 मध्ये गणपती मंदिर, लक्ष्मीनगर, आळेकर मळा, जुना दांडेकर मळा, शाडूचा मळा, बनकर मळा, शिक्षक कॉलनी, इंदिरा नगर या परिसरांचा समावेश आहे. या प्रभागात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण अशा दोन जागांचे आरक्षण आहे.

कॉंग्रेसच्या नगरसेविका कुसुम दांडेकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपशी केलेली जवळीक त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे.दुसरीकडे माजी नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस या प्रभागाच्या मोडतोडीमुळे निरुत्साही असल्या तरी पाचपुते गटाचे ते महत्वाचे शिलेदार आहेत. त्यांना निवडणूक लढवावीच लागेल.

ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांचे चिरंजीव व विद्यमान स्वीकृत नगरसेवक गणेश भोस हे या प्रभागातून मोर्चेबांधणी करीत आहेत. गणेश यांची ही तशी पहिलीच निवडणूक असल्याने भोस गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल.कॉंग्रेसचे निष्ठावंत व माजी नगरसेवक समीर बोरा या प्रभागात प्रबळ दावेदार आहेत. मात्र श्रेष्ठींच्या निर्णयाची ते वाट पाहत आहेत. त्यांचे वडील कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या निष्ठेची दाखल थेट इंदिरा गांधी यांनी घेतली होती.

दुसरीकडे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर देखील या वॉर्डातून रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत. दरेकर स्वतःच श्रेष्ठी असल्याने उमेदवारीबाबत त्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही. दरेकर उमेदवार असल्यास त्यांना जागीच रोखण्याचा प्रयत्न बड्या असामी कडून होऊ शकतो.

लक्ष्मीनगर प्रभागातून शिवसेनेकडे तगडे उमेदवार आहेत. घनश्‍याम शेलार स्वतः या प्रभागात राहतात. शेलार कुटुंबियांपैकी एखादे नाव पुढे येते की शिवसेना तालुका प्रमुख संजय आनंदकर किंवा त्यांच्या पत्नी विद्या यांना संधी मिळते हे पाहावे लागेल. सर्वसाधारण जागेवर युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब दूतारे हे सर्व ताकदीनिशी लढणार असून शिवसेनेकडून ते इच्छुक आहेत. शिवसंग्रामचे मच्छिंद्र सुद्रीक देखील याच ठिकाणाहून इच्छुक आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)