बेलवंडीत पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

महिलांच्या संतापाचा झाला उद्रेक : आठवड्यापासून पाण्यासाठी भटकंती होती सुरू

श्रीगोंदे  – मागील सात दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा न केल्यामुळे महिलांच्या रागाचा आज उद्रेक झाला. बुधवारी (दि.28) सकाळी 9 वाजताच ग्रामपंचायत कार्यालयावर गावातील महिलांनी हंडा मोर्चा नेला. अचानक झालेल्या या मोर्चामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकारी यांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय मुख्य दरवाजासमोर ठिय्या मांडल्याने ग्रामपंचायत कार्यालय उघडता आले नाही.

ग्रामसेवक माने आणि सरपंच सुप्रिया पवार यांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्‍यातील राजकीय आणि आर्थिकदृष्ट्‌या अत्यंत महत्वाचे, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षांचे गाव, श्रीगोंदा कारखाना माजी उपाध्यक्ष यांचे गाव अशी ओळख असणारे हे गाव मात्र, याच गावात मागील सात दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजनेला पाणी आलेले नाही.

त्यामुळे महिलांच्या संतापाचा आज उद्रेक झालेला पाहायला मिळाला. गावातील महिलांनी सकाळी 9 वाजताच ग्रामपंचायत कार्यालय गाठले. कार्यालयासमोर हंडे ठेवून वाजवायला सुरु केल्याने गावातील बघ्यांची गर्दी जमू लागली. ही माहिती ग्रामपणाचायत कर्मचारी आणि पदाधिकारी यांचेपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने, या महिलांसमोर सर्व पदाधिकारी हतबल झालेले दिसून आले.

अखेर ग्रामसेवक माने आणि सरपंच सुप्रिया पवार यांनी आंदोलनकर्त्या महिलांना तहसीलदार यांना टॅंकर सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे, तो मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. परंतु प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्याचेच प्रकार करत असून, लोकांच्या हिताचे काहीही घेणे देणे ग्रामपंचायतीला नसल्याची प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)