पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार : गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक

श्रीगोंदा – आगामी काळात येणारे सण उत्सव हे कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करण्यात येतील. प्रशासनाला सहकार्याची भूमिका सर्व मंडळांनी घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळात श्रीगोंदा तालुका डी. जे. मुक्‍त करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिला आहे.

दहीहंडी, गणपती व मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुक्‍यातील तीन गणेश मंडळांना पोलीस उप अधीक्षक सुदर्शन मुंडे, नायब तहसीलदार रोहिणी न्हरे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यामध्ये मागील वर्षी उत्तम व शिस्तबद्ध मिरवणूक काढलेले महादजी शिंदे मंडळ, हनुमान नगर यांना प्रथम तर काष्टी येथील महालक्ष्मी तरुण मंडळ काष्टी यांना द्वितीय तर गणराज मित्र मंडळ श्रीगोंदा यांना तृतीय बक्षीस देण्यात आले.

तालुक्‍यातील अनेक गावांत “एक गाव एक गणपती’ उत्सव साजरा होणार आहे. तसे ठराव मंजूर करण्यात आल्याचे पोवार यांनी सांगितले. बैठकीस ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, शिवसेना जिल्हा समन्वयक घनश्‍याम शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे, मुख्याधिकारी विश्‍वंभर दातीर, प्रा. तुकाराम दरेकर, नगरसेवक अशोक खेंडके, अशोक आळेकर, सतीश मखरे, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, संजय आनंदकर, अरविंद कापसे, संतोष खेतमाळीस, दीपक शिंदे, सागर गोरे, संतोष क्षीरसागर, सतीश पोखरणा, मीरा शिंदे, मीनल भिंताडे आदींसह शहरातील सर्वच मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते, वीज विद्युत मंडळाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

केरळसाठी लाखो रुपये गोळा होणार…

गणेश उत्सवात शहरातील प्रत्येक मंडळांनी प्रत्येकी 5 हजार रुपये केरळसाठी देण्याची सूचना मीरा शिंदे यांनी मांडली. यावर उपस्थित मंडळांनी अनुकूलता दाखवत मोठा निधी गोळा करण्याचा विडा उचलला. त्यामुळे केरळ विषयी माणुसकी दाखवत लाखोंचा निधी गोळा होणार हे निश्‍चित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)