हुमणीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हैराण

File photo

पिकांचे मोठे नुकसान, पिके हातची जाण्याची भीती

श्रीगोंदा – तालुक्‍यातील बहुतांश भागातील पिकांवर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. पावसाच्या अनियमिततेचा विपरीत परिणाम पिकांवर झाला असून हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. गेल्या दोन वर्षांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याचे आढळून येते. हुमणी अळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे,मात्र कृषी विभागात अद्याप शुकशुकाटच आहे.

पावसाळा अंतिम टप्प्यात आला आहे. अद्यापही तालुक्‍यात पुरेसा पाऊस झाला नाही. घोड व कुकडी धरण पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात मात्र उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. मात्र, तालुक्‍याच्या सर्वच भागात पावसाने पाठ फिरवल्याने व जवळपास गेल्या दीड – दोन महिने राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे सध्या हुमणी अळीसह कीड व इतर रोगांनी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्‍यातील ऊस, कांदा, मका, सोयाबीन एवढेच नव्हे तर काही भागात लिंबोणीवर देखील हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. हुमणी अळीने थैमान घातल्याने शेतकरी अक्षरशः घायाळ झाले आहेत.

हुमणी अळी ही कीड असून ती अंडी, अळी, कोष आणि पतंग अशा चार प्रकारांमध्ये आढळते. यातील अळीच्या अवस्थेत हुमणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ आणि त्यानंतर पिकाची मुळे खाते, परिणामी पिके वाळतात. तालुक्‍यातील मोठ्या भागात हुमणी अळीमुळे ऊस पीकाचे मोठे नुकसान होत आहे. पिकांची मुळे हुमणी फस्त करीत असल्याने ऊस किंवा इतर पिके वाळतात. सध्या हुमणीचा सर्वाधिक प्रादुर्भाव उसावर होत आहे.

हुमणी अळीचा प्रादुर्भाव शेण खतातुन मोठ्या प्रमाणावर होत आहे. कमी कुजलेले शेणखत वापरल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो. हलकी जमिनीत आणि कमी पाण्याच्या भागात या अळीचा प्रादुर्भाव अधिक असला तरी जवळपास सर्वत्र या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी प्रथमतः सेंद्रिय पद्धतीने उपाययोजना कराव्यात, हुमणी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसेल तर शेवटी रासायनिक औषधांचा वापर करावा. नुकतीच हुमणी नियंत्रणासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली आहे. त्या बैठकीतील निर्णयानुसार काम करणार आहोत.
-पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी.

तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्रावर असणाऱ्या ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. हुमणी अळीने उसाची मूळ कुरतडून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला ऊस पिवळा पडतो आणि नंतर वाळून जातो. अळ्या एका महिन्यात संपूर्ण मुळ्या कुरतडून उसाचे बेट कोरडे करतात, त्यामुळे ते कोलमडते. हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने उसाच्या उगवणीत 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. प्रौढ उसाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास ऊसाचे 15 ते 20 टनांपर्यंत उत्पादन कमी होऊ शकते.

हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात विविध औषधे उपलब्ध आहेत, मात्र या रासायनिक खतांचा व औषधांचा एकरी खर्च 1 हजार 800 ते 2 हजार 500 रुपयांपर्यंत जात आहे. हुमणी अळीचा प्रसार वेगाने होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हुमणी अळीचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्याच्या उपाययोजनांबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)