श्रीगोंद्याच्या बाजीरावाचा ‘माफीनामा’

आढळगावातील उद्‌गाराविषयी व्यक्त केली दिलगिरी : महसूल विभागाची सावध भूमिका

नगर – प्रांतअधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर वाळूचोरांनी श्रीगोंद्यात केलेल्या प्राणघातक हल्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी त्यांच्या कारवाईविषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानाविषयी बाजीराव पोवार यांनी लेखी माफीनामा सादर केला आहे. प्रातांधिकारी दाणेज यांच्याकडे त्यांनी हा माफीनामा पत्राद्वारे पाठविला आहे. पोलीस अधीक्षकांची सूचना या माफीनाम्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हा माफीनाम्यावर महसूलने सावध भूमिका घेऊन वादग्रस्त विधानाविरोधात प्रशासकीय कार्यवाही सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

-Ads-

बाजीराव पोवार यांनी माफीनाम्यात “शब्दशूर’पणा दाखविला आहे. “आपण नम्रतापूर्वक व आदरपूर्वक कळवितो की, आम्ही आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथे आपले संबंधाने जे उद्‌गार काढले आहे. त्याबाबत नम्रतापूर्वक सांगणे आहे की, नमूद भाषणादरम्यान आपण किंवा आपले विषयी अनादाराने बोलणे हा आमचा हेतू नव्हात. आमचे बोलण्यामुळे आपल्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यासाठी आपणकडे मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करत आहे.’ असा माफीनाम्यातील मजकूर आहे. त्यांनी हे पत्र गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखांमध्ये लिहिलेले आहे. ते महसूलला आता प्राप्त झाले आहे. बाजीराव पोवार यांच्या या माफीनाम्यामागे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांची प्रमुख भूमिका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच हा माफीनाचा चमत्कार झाल्याचे सांगितले गेले आहे.

महसूल विभागाने मात्र या माफीनाम्यावर सावध भूमिका घेतली आहे. वादग्रस्त विधानावर बाजीराव पोवार यांनी सादर केलेला माफीनामा हा काहीअंशी स्वीकारत तो बाजूला ठेवला आहे. प्रांतअधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर वाळूचोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात थोड्यात बचावले आहे. वाळूचोरांनी हल्ल्यात कुऱ्हाड वापरली होती. त्यांच्या वाहनावर मोठमोठाले दगड फेकले होते. वाळूचोरांवर श्रीगोंद्यात कारवाई करताना अजूनही पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. महसूल आणि पोलिसांमधील वादामुळे आतातर वाळूचोरांना रानच मोकळे झाले आहे. त्यामुळे वाळूचोरांची मुजोरी वाढली आहे. वाळूचोरांना “राजाश्रय’ मिळू लागला आहे. महसूल विभाग या माफीनाम्याकडे अधिकच सावध राहण्याचे संकेत म्हणून पाहत आहे.

महसूल व पोलीस दलाचे शीतयुद्ध पराकोटीला!

प्रातंअधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर हल्ला होऊन वीस दिवस झाले आहेत. अजूनही या हल्ल्यातील काही आरोपी मोकाट आहेत. गोविंद दाणेज यांच्या प्रकरणानंतर महसूलबरोबर पोलिसांशी निगडीत अनेक प्रकार झाले. पोलिसांनी त्यावर कडक कारवाईची भूमिका घेण्याऐवजी बघ्याची आणि बोटचेपी भूमिका घेतली. सांगवी (ता. श्रीगोंदे) येथे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी वाळूचोरांवर मोठी कारवाई केली. त्यातीलही काही आरोपी अजून पसार आहेत. पुणतांबा (ता. राहाता) येथील कुख्यात वाळूचोर विक्रांत नवले ऊर्फ बबलू याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई होऊनही पोलिसांना तो सापडलेला नाही.

सरकारी कामात अडथळा निर्माण करणे हा जामिनपात्र गुन्हा राहिलेला नाही. तरी देखील मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्यावर शासकीय कार्यालयात हल्ला करणारा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अटकपूर्व जामीन मिळविला. महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समाज माध्यमांवर बदनामीचे कटकारस्थान झाले. त्यावर तक्रार देण्यासाठी पोहचलेल्या महिला अधिकाऱ्यांची तक्रार घेण्याऐवजी त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे त्यानंतर पुढे कारवाई “म्यान’ करण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेतला. हा घटनाक्रम पाहिल्यावर पोलिसांकडून महसूलला सहकार्यच मिळत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे महसूल आणि पोलीस यांच्यातील दरी वाढत चालली आहे. एकप्रकारे दोन्ही विभागात शीतयुद्ध पेटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)