पायात पाय अडकवून पाडण्याची परंपरा खंडित होणार का?

प्रभाग क्र. 7 : सिद्धार्थ-ससाणे नगर : श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक रणसंग्राम


-अर्शद आ. शेख

प्रभागाची व्याप्ती व आरक्षण

प्रभाग क्र. 7 मध्ये दोन जागा. अनुसूचित जाती स्त्री राखीव एक व सर्वसाधारण एक असे आरक्षण आहे. या प्रभागात सिद्धार्थनगर, मिशन बंगला, विजय चौक झेंडा, बाजारतळ, जमादार गल्ली, जुनी औटीवाडी, रामोशी गल्ली, कसाब गल्ली, पिंजारी गल्ली, ढोर गल्ली आदी भागांचा समावेश आहे.

श्रीगोंदे – सिद्धार्थनगर व ससाणे नगर प्रभाग क्र. 7 दिसायला सर्वात सोपा मात्र राजकीय दृष्ट्या सर्वात असुरक्षित वॉर्ड. या प्रभागात सिद्धार्थनगर व ससाणेनगरचा परिसरासह गावातील विजय चौक हा भाग येतो. राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी पायात पाय अडकवून पाडापाडीची परंपरा या प्रभागाला आहे.

या निवडणूकीत ही परंपरा खंडीत होणार की कायम राहणार याची उत्सुकता आहे. ऐनवेळी भाजपकडून येथे “बिग फायटर’ उमेदवार आयात होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रभागातील निवडणूकीस शेवटच्या क्षणी कलाटणी मिळेल असा कयास आहे.

हा वॉर्ड दोन प्रभागांचा मिळून बनला आहे. त्यामुळे दोन भिन्न राजकीय स्थितीचे मिश्रण यामध्ये आहे. सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभागात अनुसूचित जातीची सुमारे बाराशे पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. 2009 मध्ये भागचंद घोडके (राष्ट्रवादी) यांनी नंदकुमार ससाणे (कॉंग्रेस) यांचा 122 मतांनी पराभव केला होता, तर 2014 ला गौतम घोडके (कॉंग्रेस) यांचा 123 मतांनी पाडाव केला होता. जुनेगाव (गावठाण) असलेल्या भागात 2009 मध्ये वैशाली नंदकुमार ताडे (कॉंग्रेस) विरुद्ध श्‍यामला मनोज ताडे (राष्ट्रवादी) या चुलती-पूतणीच्या लढाईत श्‍यामला ताडे 243 मतांनी विजयी झाले. निकटवर्तीयांनी आपला घात केल्याची सल नंदकुमार ताडे आजही बोलून दाखवितात.

2014 ला शह काटशहच्या डावपेचांत नंदकुमार ताडे यांना कॉंग्रेसची उमेदवारी डावलली गेली. ताडे (शिवसेना), डॉ. अनिल घोडके (राष्ट्रवादी) व हनुमंत उदमले (कॉंग्रेस) यांच्यात तिरंगी लढत झाली. याचा सर्वाधिक फटका ताडेना बसला. डॉ. घोडके 175 मतांनी विजयी झाले. जुने राजकीय हिशोब चुकते करण्याच्या इर्षेने बहुतांश उमेदवारांनी पायात-पाय अडकवून एकमेकांचा पराभव केला. अतिक कुरेशी, असिफ इनामदार, नंदू ताडे, मंदाकिनी शेलार यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

या प्रभागातील अनुसूचित जाती स्त्री राखीवमध्ये भाजपकडून माजी नगराध्यक्ष भागचंद घोडके यांच्या पत्नी साखरबाई यांना उमेदवारी निश्‍चित आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून येथे गौतमराव घोडके यांच्या सुनबाई सोनाली हृदय घोडके व माजी उपनगराध्यक्ष जालिंदर घोडके यांच्या सुनबाई पूजा गोरख घोडके यांची नावे चर्चेत आहे. युवा नेते गोरख घोडके यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर माजी नगरसेवक अनिस ससाणे यांच्या पत्नी निर्मला यांनीही मोर्चेबांधणी केली आहे.

नंदकुमार ससाणे, किशोर नेटके, कुणाल शिरवाळे दिग्गज आपल्या कुटुंबातील कोणास उभे करतात. यावर बरेच काही अवलंबून आहे. या प्रभागातून अनिल ससाणे हे दोनदा नगरसेवक झाले होते. मात्र त्यानंतर मातंग समाजातील कोणीही नगरसेवक झाला नाही, ही सल या समाजात असल्याने यंदा मातंग समाजातील एकच उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गावातून माजी उपनगराध्यक्षा वैशाली ताडे शिवसेनेकडून मैदानात उतरणार आहे.

त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची व राजकिय अस्तित्वाची लढाई असेल. सलग दोनदा झालेला पराभव हा भावनिक मुद्दा घेऊन स्वकीयांनी केलेल्या घातपाताची परतफेड करण्याची चालून आलेल्या नामी संधीचा ते फायदा उचलणार हे निश्‍चित. ढोरगल्लीचा परिसर यात आल्याने श्‍याम शिंदे यांचे ही नाव चर्चेत आहे. कोणताही पक्ष उमेदवारी देवो ती स्वीकारण्याची शिंदे यांची तयारी आहे. यासाहित इतर ही अनेक इच्छुकांच्या गर्दीत कोण वरचढ ठरणार याकडे शहराचे लक्ष आहे.

दुसऱ्या सर्वसाधारण जागेवर देखील मोठी गर्दी उसळी आहे. येथे भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रबळ उमेदवार नाहीत. काही भाग मुस्लिम बहुल असल्याने येथून मुस्लिम उमेदवारांची “भाईगर्दी’ वाढत आहे. निसार बेपारी, सादिक जमादार, अतिक कुरेशी, आ.जगतापांचे निकटवर्तीय नवाज शेख, डॉ. राज सय्यद, ऍड. इम्रान इनामदार, जावेद इनामदार, फिरोज नद्दाप यांची नावे चर्चेत आहेत.

त्याप्रमाणेच अमोल शेलार, राजू नय्यर, योगेश मोटे, नंदकुमार ससाणे, सुनील ढवळे, अण्णा शिंदे, प्रा. विजय शेलार, अनिल ससाणे, स्वप्नील खेत्रे यांची नावे देखील येथून ऐकायला मिळतात. इतर प्रभागातील उमेदवारीचे व्यवस्थित वाटप झाले तर भाजपकडून येथे अनपेक्षित नाव समोर येऊ शकते. भाजपकडून एक बिग फायटर येथे आला तर शेवटच्या क्षणी या जागेवर एकतर्फी निवडणूक होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.त्यामुळे या प्रभागातील नाट्यमय लढाईकडे सर्वांच्या नजरा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)