श्रीगोंद्यात गावठी बॉम्ब निर्मितीचे साहित्य

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

श्रीगोंदे – श्रीगोंदे शहरातून गावठी बॉंब बनविण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य पुरवले जात असल्याच्या संशयावरून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी शहरातील एका खासगी गोदामाची झडती घेतली. याप्रकरणी लिंपणगाव येथील एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समजली. ही कारवाई रविवारी (दि.28) केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सविस्तर माहिती अशी, की औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री पोलीस ठाण्यात भारतीय स्फोटके कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. गावठी बॉंब बनविण्यासाठी लागणारे साहित्य श्रीगोंद्यातून पुरवले जात असल्याच्या संशयातून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आज शहरातील एका खासगी गोदामाची झडती घेतली. या गोदामात गावठी बॉंब बनविण्यासाठी लागणारे संशयास्पद साहित्य आढळून आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समजली.

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी तालुक्‍यातील लिंपणगाव येथील एकाला वाहनासह ताब्यात घेतले असल्याचे समजते. गावठी बॉंब बनविण्याचे साहित्य श्रीगोंद्याहून औरंगाबाद आणि बीडला पाठवले जात असल्याचा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, गावठी बॉम्ब बनविण्यासाठी साहित्य पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी आलेल्या औरंगाबाद पोलिसांनी या मोहिमेची मोठी गोपनीयता पाळली; मात्र काही प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार या ठिकाणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना जिलेटीनच्या काही कांड्या सापडल्या.

गावठी बॉम्ब बनविण्यासाठी साहित्य पुरविण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर अनेक मोठी नावे धक्कादायकरित्या समोर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. स्फोटके निर्मितीसाठी साहित्य पुरवणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या तालुक्‍यातील एका राजकीय नेत्याचा मुलगा असल्याचे समजते. या गंभीर प्रकरणानंतर तालुक्‍यातील दोन-तीन राजकीय व्यक्ती औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)