सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना घातल्यात बांगड्या 

नगर : पोलीस अधीक्षकांच्या दालनाबाहेर आरडाअोरडा करताना शिवसेनेच्या स्मिता अाष्टेकर.

शिवसेनेच्या स्मिता आष्टेकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; आ. राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा

भिंगार – आमदार राम कदम यांनी मुली पळवून नेण्याच्या वक्तव्यावर जिल्हा पोलीस दलाने गुन्हा नोंदविला नाही म्हणून, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या स्मिता आष्टेकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आज अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याशी स्मिता आष्टेकर यांच्या शिष्टमंडळांची चर्चा फिसकटल्यानंतर हा प्रकार झाला. महिला पोलिसांची तुकडी बोलावून घेत स्मिता आष्टेकर आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिलांना भिंगार कॅंप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना सत्ताधाऱ्यांनी बांगड्या घातल्या आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील मुली आणि महिला सत्ताधाऱ्यांपासून असुरक्षित आहे, अशी तिखट प्रतिक्रिया स्मिता आष्टेकर यांनी व्यक्‍त केली.

आमदार राम कदम यांनी मुली पळवून नेण्याच्या वक्‍तव्यावरून शिवसेना महिला आघाडीच्या स्मिता आष्टेकर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राम कदम यांचे मुंडण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका गटाने समाजात असंतोष पसरविण्यासाठी आणि दंगल घडविण्यासाठी मुली पळवून नेण्याचे वक्‍तव्य केले आहे. या प्रकार रोखण्यासाठी भारतीय दंड संहितामधील कलम 290, 153, 505 (सी) या तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी स्मिता आष्टेकर यांनी केली होती. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे याच विषयावर आष्टेकर या शिष्टमंडळासह निवेदन घेऊन गेल्या होत्या. पोलीस अधीक्षक शर्मा आणि आष्टेकर यांची आज यावर चर्चा झाली. चर्चेतून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचा आरोप आष्टेकर यांनी केला.

आमच्या मुली आणि महिला सत्ताधाऱ्यांच्या काळात असुरक्षित आहेत. पोलीस दलाला सत्ताधाऱ्यांनी बांगड्या घालून ठेवल्या आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका आष्टेकर यांनी घेतली. पोलीस अधीक्षक यांच्या दालनातून बाहेर पडत असतानाच आष्टेकर यांनी दालनाच्या दरवाजावर पेट्रोलची बाटली काढून अंगावर ओतून घेण्याचा प्रकार केला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ती बाटली ताब्यात घेतली. यामुळे दलनावरील दरवाजावर काही काळ गोंधळ झाला. आष्टेकर यावर शांत बसल्या नाही. पोलिसांनी रक्षणाऐवजी फक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत. महिला आणि मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागेल, असा त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.

पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी आष्टेकर यांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना पुढे केले. पवार यांनी आष्टेकर यांना अटकाव केला. यावेळी देखील आष्टकेर आणि पवार यांच्यात वाद झाला. पवार यांनी आष्टेकर यांना आवाज कमी करून बोला, असे समजावले. आष्टेकर म्हणाल्या, महिला आणि मुली

सत्ताधाऱ्यांमुळे भयभीत आहेत. पळवून नेण्याची खुली धमकी दिली जात आहे. हे चालते का तुम्हाला. या प्रकाराविरोधात दाद मागण्याची कोणाकडे? उलट आमच्यावरच गुन्हे दाखल करताय, हा कोणता न्याय? गुन्ह्याची नोंद होईपर्यंत कोणत्याही परिस्थिती माघार घेणार नाही. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी या मागणीसाठी जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेच्या स्टाईलने पुन्हा येऊ, असा इशाराही आष्टेकर यांनी दिला.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि भिंगार कम्पचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्मिता आष्टेकर यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला ताब्यात घेतले. भिंगार कम्प पोलिसांनी स्मिता आष्टेकर यांच्यासह चौघा महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि आत्महत्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

पोलीस निरीक्षक पवार यांची दबंगगिरी!

स्मिता आष्टेकर यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला आडवे होत रोखून धरण्याबरोबरच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पुढे सरसावलेल्या वृत्तछायाचित्रकार प्रतिनिधींना देखील रोखत होते. यासाठी ते कॅमेरा पुढे घेऊन येणाऱ्यांवर धावून जात होते. यासाठी पवार यांच्या मदतीला त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मदत होत होती. पवार यांची ही दबंगगिरीचे अनुकरण यावेळी इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जोरात चालविले होते. स्मिता आष्टेकर व त्यांच्या शिष्टमंडळांला ताब्यात घेऊन वाहनामध्ये बसवित असतानाचे वृत्तछायाचित्रकार छायाचित्रण घेत होते. त्यावेळीही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे अनुकरण करत वृत्तछायाचित्रकारांवर दबंगगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)