शिक्षक विकास मंडळाची वास्तू भ्रष्टाचारासाठीच

ज्ञानेश्वर माळवे यांचा आरोप; 13 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

नगर – प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची ऐतिहासिक वास्तू बांधण्याचा प्रयत्न हा भ्रष्टाचार करण्यासाठीच आहे, असा आरोप सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी केला आहे.

शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीच्या प्रचारात गुरूमाउलीच्या मंडळाच्या नेत्यांनी विकास मंडळ नवीन वास्तू बांधताना प्राथमिक शिक्षकांच्या एकाही पैशाला हात लावणार नाही, असे सांगितले होते. जनता, व्यापारी, उद्योगपती, वर्गणी वा अन्यमार्गांनी पैसा उभारून ही वास्तू बांधणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले होते. निवडणूक झाल्यानंतर एका प्रसिद्घ उद्योगपतीने इमारतीच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची वर्गणी दिल्याचे शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते, असे माळवे यांनी निदर्शनास आणले. गुरूमाउली मंडळाच्या अध्यक्षांनी 51 हजार रुपयांची देणगी दिल्याचे जाहीर केले होते. या दोन्ही रकमा कोण हातावर वापरत आहेत, याबाबत स्पष्टीकरण करण्याची मागणी माळवे यांनी केली.

यापूर्वी बांधलेली विकास मंडळाची इमारत सभासदांच्याच पैशातून बांधली होती. ती पाडताना जुन्या संस्थापक सभासदांना साधे शब्दाने ही विचारले नाही. प्रत्येक सभासदांकडून एक हजार रुपये वर्गणी घेतलेली होती. विकास मंडळाची जुनी इमारत बांधल्यापासून सभासदांना एक पैचादेखील फायदा झालेला नाही. लाभांश किंवा ठेवीवर व्याज मिळालेले नाही. अगोदर जुन्यांची सत्ता होती असे स्वच्छ भक्तगण सांगतील; पण हे सर्व त्याच मंडळामध्ये पदाधिकारी होते, हे सभासद विसरलेले नाही.

नाव बदलून जुनाच धंदा या सोनेरी टोळीने सुरू केला आहे, असा आरोप माळवे यांनी केला आहे. विकास मंडळाच्या माध्यमातून किती शिक्षकांचा फायदा झाला, पुढे किती जणांचा होणार, असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. नगरला कायम असणाऱ्यांना उठण्या-बसण्यासाठी ठिकाण पाहिजे. त्यासाठी 13 कोटींचे बांधकाम करण्याचा घाट आहे. त्यातून मिळणारा मलिदा लाटण्याच्या लालसेतून लाभार्थी आता जिल्हाभर दौरे आखत आहे.

तयार होणाऱ्या इमारतीतील गाळ्यांचे अगोदरच बुकिंग झाले आहे. गुरूमाउली मंडळातील नेत्यांचेच त्यावरून वाद सुरू झाले आहेत. सामान्य सभासदांना त्या संभाव्य इमारतीशी काही देणे घेणे नाही. सभासदांच्या खिशाला तोशीस न लावता इमारत बांधण्याची सूचना माळवे यांनी केली आहे. सभासदांना भूलथापा मारून वर्गणी गोळा करायची बंद करा असे आवाहन सदिच्छा मंडळाचे राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, मोहन शिंदे, बबन ढाकणे, माधव हासे, रामदास खेडकर, शरद गिरवले,बाळासाहेब साळुंके, कारभारी बाबर आदींनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)